प्रत्येक कुटुंबाचे ‘आरोग्य सर्वेक्षण’ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:11 AM2021-04-29T04:11:16+5:302021-04-29T04:11:16+5:30
गावच्या लोकसंख्येनुसार कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त पाच याप्रमाणे गावनिहाय सर्वेक्षण पथके तयार करण्यात आली आहेत. पाच दिवसात ...
गावच्या लोकसंख्येनुसार कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त पाच याप्रमाणे गावनिहाय सर्वेक्षण पथके तयार करण्यात आली आहेत. पाच दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश तहसीलदार राहुल कोताडे यांनी संबंधित पथकांना दिले आहेत.
कोरोना प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांचे लवकर निदान झाले तर त्यांच्यावर लवकर उपचार करता येतील. रुग्णाचे प्राण वाचवता येतील, तसेच त्यांचे विलगीकरण केल्यामुळे त्यांच्यापासून इतर व्यक्तींना होणारा संसर्ग टाळता येईल या उद्देशाने प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांचे आरोग्य सर्वेक्षण करण्याचे काम या उपक्रमात हाती घेण्यात आले आहे. अनेक रुग्ण दवाखान्यात भरती होत असतानाच त्यांची ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा खाली आलेली असते. एचआरसीटी स्कोरही वाढलेला असतो. कोरोनाच्या पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजन लागण्याचे प्रमाण जास्त असून त्यामुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांना वेळेवर औषधांचा पुरवठा करणे अत्यंत जिकिरीचे आणि जोखमीचे झाले आहे. त्यामुळे तातडीने तालुकास्तरावर प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आरोग्य सर्वेक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
त्यानुसार प्रत्येक पथकातील कर्मचारी दररोज ५० कुटुंबांचे सर्वेक्षण करतील.
इन्फो
संशयितांची करणार आरटीपीसीआर
सर्वेक्षणादरम्यान घरातील प्रत्येक व्यक्तीचे तापमान, ऑक्सिजन पातळी, पल्स रेट यांच्या नोंदी घेतील. ऑक्सिजन पातळी खालावलेल्या तसेच अधिक तापमान असलेल्या, कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांची, सारी रोगाची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांची स्वतंत्र माहिती तयार करून ही माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांना देण्यात येईल. या संशयित रुग्णांची आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली जाईल. त्याच किंवा दुसऱ्या दिवशी सदर रुग्णांची कोविड टेस्ट करण्याची जबाबदारी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्याची राहील.
इन्फो
ग्रामपंचायत पुरवणार साहित्य
सर्वेक्षण पथकास पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन, बॅटरी सेल आणि सर्वेक्षणाची माहिती भरण्यासाठी रजिस्टर आदी साहित्य ग्रामनिधीतून उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर टाकण्यात आली आहे. संबंधितांना साहित्य मिळाले किंवा नाही याची माहिती घेण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. आवश्यक साहित्य मिळाले नाही किंवा नादुरुस्त झाले म्हणून सर्वेक्षण करता आले नाही, अशी बाब कोणत्याही ठिकाणी आढळून आल्यास संबंधित ग्रामसेवकास त्यासाठी जबाबदार धरण्यात येणार आहे.