दुकानदार, भाजी विक्रेत्यांचे होणार आरोग्य सर्वेक्षण; कोरोनाची संभाव्य दुसरी लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 12:53 AM2020-11-13T00:53:31+5:302020-11-13T07:01:40+5:30
छोट्या व्यावसायिक गटांमध्ये किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, पदपथ विक्रेते, छोटे हॉटेलचालक, टपरीचालक, वेटर, घर कामगार यांचा समावेश राहणार आहे.
नाशिक : कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना कितीही वाढला तरी ज्या व्यावसायिकांशी नागरिकांचा संपर्क येतो, त्यांचे प्रशासनाच्या माध्यमातून लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वाधिक संपर्क येणाऱ्या व्यावसायिक गटांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाकडून कोणत्या व्यावसायिकांचे सर्वेक्षण करायचे, त्याबाबत स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले. त्यात छोट्या व्यावसायिक गटांमध्ये किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, पदपथ विक्रेते, छोटे हॉटेलचालक, टपरीचालक, वेटर, घर कामगार यांचा समावेश राहणार आहे.
घरगुती सेवा पुरवणाऱ्यांपैकी दूध घरपोच करणारे दूधविक्रेते, घरकाम करणाऱ्या महिला, घरगुती नोकर, गॅस सिलिंडर वाटप करणारे कर्मचारी, इलेक्ट्रिक वस्तू विक्रेते, दुरुस्ती करणारे मेकॅनिक, नळजोडणी करणारे प्लंबर, लॉन्ड्री, ड्रायव्हर्स, टेम्पोचालक यांच्यासह हमाली, रंगकाम करणारे आणि बांधकाम करणारे मजूर तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ड्रायव्हर, कंडक्टर आणि अन्य कर्मचारी, हाउसिंग सोसायटीत राहणारे सिक्युरिटी गार्ड, सुरक्षारक्षक, अत्यावश्यक सेवा पुरवणारे शासकीय, निमशासकीय कर्मचारी, पोलीस, होमगार्ड अशा विविध गटांतील नागरिकांचा त्यात समावेश केला जाणार आहे.
या नागरिकांचे समूह स्वरूपात सर्वेक्षण केल्यास कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध घालणे शक्य होणार आहे. त्यासाठी नियोजनबद्धपणे या व्यावसायिकांच्या समूहाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. दैनंदिन प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात किमान ५० टक्के नमुने हे या गटातील व्यक्तींचे असावेत, यादृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.