नवीन स्ट्रेन नसल्याबाबत आरोग्य यंत्रणा ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:14 AM2021-03-20T04:14:38+5:302021-03-20T04:14:38+5:30

नाशिक : दोन आठवड्यांपासून कोरोनाचा प्रसार खूप वेगाने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनसह युरोपातील पाच देशांमधील स्ट्रेन आढळून ...

The health system insists on not having new strains | नवीन स्ट्रेन नसल्याबाबत आरोग्य यंत्रणा ठाम

नवीन स्ट्रेन नसल्याबाबत आरोग्य यंत्रणा ठाम

Next

नाशिक : दोन आठवड्यांपासून कोरोनाचा प्रसार खूप वेगाने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनसह युरोपातील पाच देशांमधील स्ट्रेन आढळून आल्याच्या चर्चेला अखेर मुख्यमंत्र्यांच्या विधानाने पूर्णविराम मिळाला आहे. आरोग्य खात्याच्या प्रधान सचिवांनीच कोणत्याही नमुन्यात भिन्न स्ट्रेन नसल्याचे स्पष्ट केल्याने आरोग्य यंत्रणादेखील दुसऱ्या देशांचे स्ट्रेन नसल्याबाबत ठाम आहे.

मार्च महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाचा वेग वाढू लागला आणि त्यात गत आठवड्यापासून दुप्पट तर तीन दिवसांपासून तिप्पट वेग वाढल्याने कोरोना प्रसाराच्या या वेगामागे काही वेगळे कारण असेल का, अशा चर्चेला बहर आला होता. विशेषत्वे लागोपाठ दोन दिवस दोन हजारांहून अधिक बाधित आढळल्याने तर कोरोना प्रसारामागील कारणाच्या चर्चेलाच अधिक बहर आला होता. त्यामुळेच राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे काही संशयित नमुने पाठवून त्यांच्या आलेल्या अहवालातून ३० टक्के नमुन्यांबाबत संदिग्धता व्यक्त करण्यात आली होती. दुबई आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनप्रमाणेच त्याचे स्वरूप असल्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र, आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांनीच ते स्ट्रेन यूके किंवा अन्य देशांप्रमाणे नसल्याचे स्पष्ट केल्याने आरोग्य विभागानेदेखील स्ट्रेन नसल्याच्या मतावर शिक्कामोर्तब केले आहे. ते स्पष्टीकरण देताना बदलांच्या ज्या विशिष्ट क्रमात जीनोम असणे आवश्यक आहे, तसे ते नसल्यामुळेच ते भिन्न स्ट्रेन नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

इन्फो

वेगवान वाढीमागील कारणाबाबत संदिग्धता

नवीन स्ट्रेन नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला असला तरी अचानकपणे आठवडा-दीड आठवड्यात १५ हजारांहून अधिक नवीन बाधित आढळण्याचे कारण काय, असा सवाल त्यानिमित्ताने चर्चिला जाऊ लागला आहे. रुग्णसंख्या वाढीमागे केवळ गर्दी आणि नागरिकांची बेफिकिरी एवढेच कारण असेल तर नागरिक कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागल्यावर गत नाेव्हेंबरपासून अशाच प्रकारे वावरत आहेत. त्यामुळे मग अचानकपणे मार्च महिन्यातच हजार, दीड हजार आणि दोन हजारांच्या पटीत वाढ होण्याचे कारण उलगडत नसल्याने आरोग्य यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे.

Web Title: The health system insists on not having new strains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.