आरोग्य विद्यापीठ, विश्वकोश मंडळात करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:22 AM2019-07-12T00:22:41+5:302019-07-12T00:23:02+5:30
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ यांच्यात ज्ञानमंडळ स्थापन करण्यासाठी परिचर्या विषयासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य कराराचे आदान-प्रदान करण्यात आले.
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ यांच्यात ज्ञानमंडळ स्थापन करण्यासाठी परिचर्या विषयासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य कराराचे आदान-प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव, श्यामकांत देवरे, अध्यक्षांचे स्वीय सहायक उमाकांत खामकर, समन्वयक डॉ. सरोज उपासणी, विधि अधिकारी संदीप कुलकणी, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे, विद्याव्यासंगी सहायक संतोष गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कुलगुरु म्हणाले, विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे मराठी विश्वकोशाचे अद्ययावतीकरण करण्याचे काम सुरू आहे. विविध विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार करून मराठी विश्वकोशातील नोंदी अद्ययावत करण्याची प्रक्रि या सुरू आहे. याकरिता मराठी विश्वकोश मंडळातर्फे विविध विद्यापीठांसमवेत ज्ञानमंडळाची स्थापना केली आहे. या अनुषंगाने आरोग्य विद्यापीठाच्या सहकार्याने परिचर्या विषयासाठी ज्ञान मंडळाची स्थापना करण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात येत आहे.
कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विज्ञान आणि तंत्रज्ञानात नवनवीन संशोधनामुळे भर पडली आहे. तसेच नवनीवन विद्याशाखा निर्माण होत आहेत. त्या अनुषंगाने विश्वकोशातील नोंदी, लेखांचे लेखन, समीक्षण, संपादन त्या त्या विषयातील तज्ज्ञांकडून करणे आवश्यक आहे. याकरिता विद्यापीठाने पुढाकार घेऊन परिचर्या विषयासाठी ज्ञानमंडळ स्थापन करणेसाठी हा सामंजस्य करार केला आहे. आरोग्य शिक्षणातील परिचर्या विषयातील ज्ञानमंडळासंदर्भात लवकरच विद्यापीठातर्फे बैठका व कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यशाळेद्वारे संबंधित विषयातील लेखकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आरोग्य विद्यापीठातर्फे परिचर्या विषयाच्या ज्ञानमंडळासाठी डॉ. सरोज उपासनी समन्वयक म्हणून तर विद्यापीठ व मराठी विश्वकोश मंडळ या दरम्यान विविध उपक्र मांसाठी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे हे संयोजन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापिठाशी पहिलाच करार
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव श्यामकांत देवरे यांनी सांगितले की, आजपर्यंत राज्यातील ४६ विद्यापीठे, संस्थांसमवेत सामंजस्य करार केले असून, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासोबत परिचर्या विषयासाठी ज्ञानमंडळाची स्थापना करण्यासाठीचा हा पहिलाच करार आहे. विद्यापीठ आणि विविध संस्था यांच्या माध्यमातून आरोग्य शिक्षणातील विविध महत्त्वाच्या विषयांसाठी ज्ञानमंडळ स्थापन होऊन अद्ययावत ज्ञान सर्वांसमोर येणे आवश्यक आहे. या कराराच्या माध्यमातून विश्वकोश खंड अभ्यासक व विद्यार्थ्यांसाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त राहील.