आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा २ जूनपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:14 AM2021-04-16T04:14:40+5:302021-04-16T04:14:40+5:30
नाशिक : राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने १९ एप्रिलपासून होणाऱ्या हिवाळी २०२० ...
नाशिक : राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने १९ एप्रिलपासून होणाऱ्या हिवाळी २०२० व उन्हाळी २०२१ लेखी परीक्षा जूनपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी या संदर्भात निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी दिली.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या यापूर्वी जाहीर वेळापत्रकानुसार हिवाळी २०२० परीक्षांच्या तिसऱ्या टप्प्यात १९ एप्रिल ते १२ मे या कालावधीत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासह पदवीपूर्व व पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. या परीक्षा आता २ जूनपासून सुरू होणार आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी २०२०च्या प्रथम वर्ष (२०१९ बॅच) अभ्यासक्रमाच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आधुनिक मध्यमस्तरीय सेवक अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिनांक ३ ते ७ मे या कालावधीत होणार होत्या. आता यातील माता, बाल आणि किशोरवयीन कुटुंब कल्याण आरोग्य सेवांसदर्भातील अभ्यासक्रमाच्या परीक्षा २ जूनला सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत होणार आहे. तर वैद्यकीय, शल्यक्रिया आणि क्लिनिकल सेवांसदर्भातील परीक्षा ३ जूनला व पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखा परीक्षा २४ ते ३० जून या कालावधीत होणार आहे. सार्वजनिक स्वास्थ्य विषयांसंदर्भातील परीक्षा ४ जूनला होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिली आहे.
इन्फो
प्रथम वर्ष एमबीबीबीएस (२०१९ बॅच पुरवणी )
दिनांक - विषय
२ जून - शारीरिक रचना - १
४ जून - शारीरिक रचना - २
६ जून - शरीरविज्ञान शास्त्र - १
८ जून - शरीरविज्ञान शास्त्र - २
१० जून - जीवरसायनशास्त्र - १
१२ जून - जीवरसायनशास्त्र - २