कोरोनाची लस घेण्याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनातही भीतीचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:11 AM2021-01-10T04:11:33+5:302021-01-10T04:11:33+5:30
नाशिक : कोरोनाच्या लसीकरणाला या महिन्यातच प्रारंभ होण्याची शक्यता असून, पहिल्या टप्प्यात सर्व कोरोना योद्ध्यांना लस दिली जाणार ...
नाशिक : कोरोनाच्या लसीकरणाला या महिन्यातच प्रारंभ होण्याची शक्यता असून, पहिल्या टप्प्यात सर्व कोरोना योद्ध्यांना लस दिली जाणार आहे. मात्र, देश-विदेशातून येत असलेल्या काही वृत्तांमुळे, तसेच उलटसुलट चर्चांमुळे काही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनातही कोरोना लस घेण्याबाबत भीतीचे सावट असल्याचे दिसून येत आहे.
भारतात लसीकरणामध्ये प्राधान्य कोरोना योद्ध्यांना अर्थात शासकीय आणि खासगी आरोग्य कर्मचारी, अधिकाऱ्यांचा राहणार आहे. त्यामुळे जी लस निश्चित होईल, ती लस सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना एक तर त्यांच्या रुग्णालयात किंवा शासनाकडून नेमून दिलेल्या केंद्रांवर घेता येणार आहे. त्याबाबतही लवकरच शासनाकडून दिशानिर्देश जाहीर करण्यात येणार आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या लसीकरणाची यशस्वी सांगता झाल्यानंतर, पोलिसांसह इतर कोरोना योद्ध्यांनाही ही लस देण्यात येईल. त्यानंतर, बहुदा बुथपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या नागरिकांना राहणार आहे. यामध्ये वयोवृद्ध, गंभीर स्वरूपाचे रुग्ण, अपंग व्यक्ती यांचा समावेश असेल आणि त्यानंतर सामान्य नागरिकांना बुथवर जाऊन ही लस घ्यावी लागणार आहे. मात्र, आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी, तसेच काही तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांनाही लसीच्या विश्वासार्हतेबाबत अद्यापही काहीशी साशंकता आहे. त्यामुळे सर्वप्रथम आरोग्य विभागातील, तसेच त्या कामाशी निगडित अन्य कर्मचाऱ्यांच्या मनातील कुशंकांचे निरसन होण्याची आवश्यकता आहे.
इन्फो
कर्मचाऱ्यांच्या मनात साशंकता
नाशिक जिल्ह्यातील विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांच्या मनात प्रस्तावित लसीकरणाबाबत काहीशी साशंकात आहे. या लसीने काही त्रास होणार नाही ना, हात जड पडणे, मळमळणे अशा काही तक्रारी झाल्यास त्या किती काळ राहतील, असे अनेक प्रश्न त्यांना सतावत आहेत.
इन्फो
निवडणुकांच्या धर्तीवर महालसीकरण
लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर कोरोना महालसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. प्रत्येक वॉर्डातल्या प्रत्येक शाळेत आणि सरकारी संस्थांमध्ये लसीकरणाचे बुथ उभारले जातील. ज्या बुथवर जाऊन तुम्हाला लस टोचून घ्यावी लागेल. यावेळी ऑनलाइन पद्धतीचाही अवलंब होऊ शकतो आणि ऑनलाइन टोकन घेतल्यानंतरच तुम्हाला तुमच्या जवळच्या कोरोना बुथवर लसीकरणासाठी जावे लागेल. कोरोनाच्या लसीकरणासाठी खास सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. लसीचा साठा आणि त्याची मागणी या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संचलित केली जाणार आहे. या लसीकरण अभियानाबद्दल देशात गैरसमज पसरण्याची शक्यता आहे.
इन्फो
लस एक-दोन आठवड्यात
सध्याची परिस्थिती पाहता, सीरमची कोविशिल्ड लस देशाला परवडणारी आहे, शिवाय ही लस पुढच्या एक-दोन आठवड्यांत येण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतर, लस लवकर येणार असल्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. संपूर्ण ज्या लसीकडे मोठ्या आशेने पाहतोय, ती सीरमची लस अवघ्या २०० ते २५० रुपयांमध्ये मिळण्याची शक्यता आहे, तर खासगी संस्थांना ही लस १ हजार रुपयांपर्यंत मिळू शकते. मात्र, केंद्र सरकार यासाठी महालसीकरण मोहीम राबवत आहे. त्यामुळे ही लस फुकटात सर्वांना टोचली जाण्याची शक्यता आहे.
कुणीही भीती बाळगू नये
जी लस आरोग्य कर्मचारी किंवा नागरिकांना दिली जाणार आहे, ती सर्व लसींच्या चाचण्यांचे टप्पे पार करूनच दिली जाणार आहे. त्यामुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. उलट सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निर्धारित दिवशी वेळेत लस घेऊन स्वत: सुरक्षित होणे आवश्यक आहे.
बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी