आरोग्य कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांच्या सुरक्षेची चिंता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:13 AM2021-04-06T04:13:45+5:302021-04-06T04:13:45+5:30
नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नाशिकमध्येदेखील थैमान घातले असताना आरोग्य कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेच्या चिंतेने ग्रासले आहे. विशेषत्वे ...
नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नाशिकमध्येदेखील थैमान घातले असताना आरोग्य कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेच्या चिंतेने ग्रासले आहे. विशेषत्वे या लाटेत लहान बालकांनादेखील मोठ्या प्रमाणात लागण होत असल्याने ज्यांच्या घरात लहान मुले आहेत, त्यांच्यासाठी कर्तव्य बजावून घरी परतणे संकटाला निमंत्रण देत असल्यासारखे वाटू लागले आहे.
कोरोनाच्या उद्रेकानंतर एप्रिलपासून सुमारे तीन महिने आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कोरोनाविरोधात लढाई सुरू असतानाच्या प्रारंभीच्या काळात तीन दिवस काम आणि एक दिवस आराम असे धोरण प्रारंभीच्या टप्प्यात ठेवण्यात आले होते. त्यानंतर तीन महिन्यांनी कोरोनायोद्ध्यांना काहीशी विश्रांती मिळावी म्हणून पाच दिवस काम आणि दोन दिवस सलग आराम असे प्रयोगदेखील करण्यात आले. मागील सलग बारा महिन्यांपासून आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कोरोनाविरोधात लढाई सुरू आहे. नोव्हेंबरपासून कोरोनाचा आलेख खाली आल्यानंतर तीन महिने कर्मचाऱ्यांना नियमित काम आणि सुट्ट्या मिळू लागल्या होत्या. मात्र फेब्रुवारीच्या मध्यानंतर पुन्हा रुग्ण वाढू लागल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढतच चालला आहे. या कोरोनायोद्ध्यांना काहीशी विश्रांती मिळण्याची पुन्हा आवश्यकता निर्माण झाली आहे. एकीकडे शासकीय कर्मचाऱ्यांना ५० टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात येते. मात्र त्याचवेळी आरोग्य कर्मचाऱ्यांबाबत मात्र उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या राहाण्याच्या व्यवस्थेबाबत काही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरापर्यंत कोरोनाचे संकट नेण्याची स्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या घरात ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुले आहेत, अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना कुटुंबाला धोक्यात घालून काम करणे अनिवार्य झाले आहे. कर्मचाऱ्यांना वाटणाऱ्या आपल्या कुटुंबातील घटकांच्या चिंतेबाबत कुणीच दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नाइलाजास्तव सगळ्यांनाच आपल्यामुळे कुटुंबात लागण होईल का, या दडपणाखाली काम करावे लागत आहे.
आमच्या मुलांच्या सुरक्षेचे काय?
लसीकरण करताना केवळ आम्हालाच लस देण्यात आली आहे. मुला-मुलींना अद्यापही लसीकरण झालेले नाही. अशा परिस्थितीत आमच्याकडून घरातील बालकांना कोरोनाची लागण झाल्यास त्याबाबत काही विचार करण्यात आलेला नाही.
संजय गामणे, आरोग्य कर्मचारी
---
कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आता पुन्हा एकदा आमच्या कुटुंबातील बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला घरी जाणेदेखील संकटाचे वाटू लागले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वत:पेक्षाही कुटुंबाच्या समस्येची मोठी चिंता वाटत आहे.
ज्योती बागुल, आरोग्य कर्मचारी
----
केवळ कर्तव्य म्हणून...
कोरोनासाठी झटताना वर्षभराचा कालावधी उलटून गेला आहे. त्यात या दुसऱ्या लाटेमुळे कुटुंबातील मुला-मुलींची अधिकच काळजी वाटू लागली आहे. मात्र केवळ कर्तव्य म्हणून ती काळजी बाजूला ठेवून नाइलाजास्तव कामावर यावे लागत आहे.
संदीप कपिले, आरोग्य कर्मचारी
--------------------------------------
ही डमी आहे.