आठ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचणार आरोग्य कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:24 AM2020-12-03T04:24:07+5:302020-12-03T04:24:07+5:30
नाशिक : जिल्ह्यात कुष्ठरोग तसेच क्षयरोग असलेले रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा जिल्ह्यातील आठ लाख कुटुंबांना ...
नाशिक : जिल्ह्यात कुष्ठरोग तसेच क्षयरोग असलेले रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा जिल्ह्यातील आठ लाख कुटुंबांना भेटी देणार आहेत. या मोहिमेस डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात करण्यात आली असून, संपूर्ण महिना ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. दरम्यान, काही ठराविक तालुके तसेच वाड्या, पाड्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून तेथील रुग्ण शोधण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोधमोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, सहायक संचालक कुष्ठरोग विभाग डॉ. रवींद्र चौधरी, सहा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम, नाशिक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. तुरावली देशमुख व सर्व तालुका आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचे उपस्थितीत करण्यात आले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य व शिक्षण सभापती सुरेखा दराडे यांचे मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात सदरची मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात दरवर्षी कुष्ठरोगी आणि क्षयरोगी शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मोहिम राबविली जाते. कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांना लवकरात लवकर ओळखून उपचाराखाली आणणे गरजेचे असल्याने या मोहिमेत अशा रुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात ४३ लक्ष ४६ हजार १३५ एवढी लोकसंख्या आहे. ग्रामीण भागात ३७ लक्ष १० हजार, ३७५, तर शहरी भाग अर्थात नगरपालिका असलेल्या ठिकाणी ६ लक्ष ३५ जार ७९० एवढी लोकसंख्या आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील एकूण ८ लक्ष ६९ हजार २२७ कुटुंबांना भेट दिली जाणार आहे यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ३८२० टीम तयार करण्यात आल्या आहेत. रुग्ण शोधमोहिमेत कर्मचारी प्रत्येक घरी भेट देऊन घरातील व्यक्तींची तपासणी करणार आहेत. यामध्ये संशयित रुग्णांची माहिती घेऊन त्यांना योग्य पद्धतीने तपासणी करून उपचार देण्यात येणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सदरची मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी या मोहिमेसाठी येणाऱ्या आरोग्यसेवक-आरोग्यसेविका यांना नागरिकांनी सहकार्य करून आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्यप्रकारे व खरी माहिती द्यावी व तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आवाहन केले आहे.