आरोग्य कर्मचाऱ्यांनी ठोकला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 01:34 AM2019-06-10T01:34:37+5:302019-06-10T01:36:10+5:30
नाशिक : नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील वसंतनगर तांड्यावरील रहिवाशांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्यानंतर गावातच आरोग्य कर्मचाऱ्यांनी तळ ठोकला असून, तातडीची उपायोजना म्हणून तात्पुरता इमर्जन्सीकक्ष गावातील मंदिरातच सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, सदर आजाराचा फैलाव हा दूषित पाण्यामुळेच झाला असल्याचा संशय आहे.
नाशिक : नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील वसंतनगर तांड्यावरील रहिवाशांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्यानंतर गावातच आरोग्य कर्मचाऱ्यांनी तळ ठोकला असून, तातडीची उपायोजना म्हणून तात्पुरता इमर्जन्सीकक्ष गावातील मंदिरातच सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, सदर आजाराचा फैलाव हा दूषित पाण्यामुळेच झाला असल्याचा संशय आहे.
नांदगाव तालुक्यातील जातेगाव ग्रामपंचायत अंतर्गत वसंतनगर तांडा येथे टरबूज खाल्याने २० ते २५ लोकांना अचानक उलटी व जुलाबाचा त्रास झाल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यासुनार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत गावात आरोग्य पथक पाठवून उपचार सुरू करण्यात आले. सात जणांवर नांदगाव येथील ग्रामीण रु ग्णालयात उपचार करण्यात आले, तर सात जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले. आजवर दवाखान्यात दाखल असलेल्या सर्व रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, प्रकृती नियंत्रणात असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
जातेगाव येथील वसंतनगर येथे शुक्र वारी गावातील लोकांना दुपारी अचानक उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. सायंकाळी हा त्रास वाढल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी बोलठाण येथील डॉ. नवरे यांच्यासह त्यांच्या पथकाला तत्काळ गावात पाठवून रुग्णावर उपचार करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी गट विकास अधिकारी जगन सूर्यवंशी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी गावात थांबून नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, ग्रामस्थांनी खाल्लेल्या टरबुजाचा नमुना घेऊन तपासणी करण्याचे निर्देश डॉ. नरेश गिते यांनी आरोग्य विभागाला दिले असून, त्यानुसार नमुने तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. असे असले तरी रुग्णांच्या आजारपणाचे लक्षण आणि इतक्या जणांना झालेली लागण लक्षात घेता हे दूषित पाण्यामुळे झाल्याची शक्यता असल्याने येथील पाणीपुरवा सुरक्षित करण्याचे आदेशदेखील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी दिले आहेत.