आरोग्यावरून सभा वादळी
By admin | Published: May 30, 2017 12:14 AM2017-05-30T00:14:50+5:302017-05-30T00:15:02+5:30
नाशिक : आरोग्य विभागाची उडालेली दैना, अधिकारी नसल्याने रुग्णांची होत असलेली हेळसांडया विषयांवर सदस्यांनी धारेवर धरल्याचे चित्र होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आरोग्य विभागाची उडालेली दैना, अधिकारी नसल्याने रुग्णांची होत असलेली हेळसांड आणि गरज नसताना केलेल्या बदल्या या अनेक विषयांवर सर्वसाधारण सभेत आरोग्य विभागाला सदस्यांनी धारेवर धरल्याचे चित्र होते.
दरम्यान, कोणालाही न सांगता परस्पर धुळे जिल्ह्यातून ३४ शिक्षकांना अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी परस्पर नाशिकला बदलून घेण्याच्या प्रकारामागे मोठी आर्थिक हेरफार झाली असून, त्याची चौकशी करण्याचा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. तूर्तास या ३४ शिक्षकांना पुन्हा धुळे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचे आदेश सभापती यतिन पगार यांनी शिक्षण विभागाला दिले.
बाळासाहेब क्षीरसागर यांनी नैताळे आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून, निवासी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचा आरोप केला. येथे फक्त दिवसाच वैद्यकीय अधिकारी उपचार करीत असल्याचे सांगितले. एका परिचराने मद्य पिऊन रुग्णांसोबत असभ्य वर्तन केल्याचेही क्षीरसागर यांचे म्हणणे होते. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी देण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी दिले. संजय बनकर यांनी पाटोदा आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याचे स्पष्ट केले. अश्विनी अहेर यांनी न्यायडोंगरी गटात तर १५० कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून, आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नसल्याचे सांगितले. लता बच्छाव यांनी ब्राह्मणगाव गटात तर आरोग्य विभागाची पदे रिक्त असल्याने आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आरोप केला. हरिदास लोहकरे यांनी आरोग्याच्या झालेल्या बदल्यांमध्ये अनियमितता असल्याचे सांगितले.