आरोग्यासाठी योग्य जीवनशैलीची गरज : तात्याराव लहाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:17 AM2018-04-28T01:17:43+5:302018-04-28T01:17:43+5:30
नाशिक : निरोगी व दीर्घायुष्यी आरोग्यासाठी चांगली जीवनशैली ही आज अत्यंत आवश्यक बाब बनली असून, प्रत्येकाने त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. क. का. वाघ महाविद्यालयातर्फे आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. शुक्रवारी (दि.२७) रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. ते पुढे म्हणाले की, आजच्या पिढीने चुकीची जीवनशैली अंगीकारली आहे. जंकफूड, मद्यसेवन, व्यसने, जीवघेणी स्पर्धा आणि त्यातून येणारे ताणतणाव यामुळे हजारो आजार त्यांनी स्वत:हून बोलावून घेतले आहेत. या ताणतणावामुळे मेंदूला पुरेशी विश्रांतीच मिळत नसून जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. या चुकीच्या जीवनशैलीमुळे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सर्व अवयवांना आजार होत आहेत. हॉटेलिंग व त्या मार्गाने होत असलेल्या अतिरेकी घातक पदार्थांच्या सेवनाचे परिणाम कळत असूनही त्याला प्रोत्साहन देणाऱ्या कुटुंबांना त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागू शकते. मुलांच्या व्यसनाधिनतेला खतपाणी घालणाºया किंवा डोळेझाक करणाºया पालकांमुळेच पुढल्या पिढ्या संस्कारापासून वंचित राहत आहेत. याप्रसंगी डॉ. राहुल बावीस्कर, वाघ संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, चांगदेव होळकर, डॉ. के. एन. नांदूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. क. का. वाघ परफॉर्मिंग आर्टसच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘गुरू परमात्मा परेशु’ या स्वागतगीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्राचार्य कडवे यांनी प्रास्तविक केले. ज्योती पवार यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी वाघ शिक्षणसंस्थेचे कर्मचारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
संस्काराची शिदोरी पुढल्या पिढीकडे सुपूर्द करावी
आपल्या आधीच्या पिढ्यांनी दिलेली संस्काराची शिदोरी आपणही पुढल्या पिढीकडे सुपूर्द करायला हवी. तरच चांगल्या आरोग्याचा मंत्र टिकून राहील. त्यामुळे प्रत्येकाने त्याचा विचार करून आपल्या आयुष्याची दोरी कमजोर करायची की बळकट करायची याचा निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात डिन पदावर सुमारे आठ वर्षे काम केल्यानंतर चुकीच्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आयुष्यात काय काय परिणाम होऊ शकतात हे आपण फार जवळून पाहिल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.