वादग्रस्त पुलांबाबत सुनावणी झाली पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 01:07 AM2021-02-08T01:07:22+5:302021-02-08T01:07:46+5:30
शहरातील गंगापूर रोड येथे गोदावरी नदीवर आणखी दोन पूल बांधण्यात येेणार असून, त्यातील पुलांवर आक्षेप घेणाऱ्या याचिकाकर्त्यांची राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकतीच सुनावणी घेण्यात आली आहे. ही सुनावणी पूर्ण झाल्याने, आता शासन काय निर्णय घेते, याकडे गंगापूर रोडवरील पम्पिंग स्टेशन परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
नाशिक : शहरातील गंगापूर रोड येथे गोदावरी नदीवर आणखी दोन पूल बांधण्यात येेणार असून, त्यातील पुलांवर आक्षेप घेणाऱ्या याचिकाकर्त्यांची राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकतीच सुनावणी घेण्यात आली आहे. ही सुनावणी पूर्ण झाल्याने, आता शासन काय निर्णय घेते, याकडे गंगापूर रोडवरील पम्पिंग स्टेशन परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
गोदावरी नदी शहरातून वाहत जाताना मुळातच गंगापूर रोड परिसरात आसाराम बापू आश्रमाजवळ महापालिकेने पूल बांधला आहे. त्या पलीकडे फॉरेस्ट नर्सरी परिसरातही पूल आहे. त्यानंतर इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयाकडून हनुमानवाडीकडे जातानाही पूल आहे. अवघ्या दोन ते अडीच किलोमीटर अंतरातच तीन पूल बांधले जात असताना, याच दरम्यान आणखी दाेन पूल बांधण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यात गोदापार्कजवळील पुलाचे काम जोरात सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला पम्पिंग स्टेशनजवळून कुसुमाग्रज स्मारकाच्या दरम्यान जाणाऱ्या जलवाहिनीलगत आणखी एक पूल बांधण्याचे नियोजन आहे. हा पूल स्थायी समितीने मंजूर करताना, भाजपच्याच आमदार देवयानी फरांदे यांनीही विरोध केला होता. त्यामुळे पुलाचे काम चर्चेत आले होते.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्या ३ फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीच्या वेळी डॉ. प्रकाश पाटील, डॉ.परीक्षित महाजन, आर्किटेक्ट पंडित काकड, बाळासाहेब कोल्हे यांच्यासह अन्य रहिवाशांनी बाजू मांडली. आता शासन काय निर्णय देणार, यावर पुलाचे पुढील भवितव्य ठरणार आहे.