पुनर्विलोकन याचिकेवर हरित लवादापुढे सुनावणी
By admin | Published: October 30, 2016 12:27 AM2016-10-30T00:27:32+5:302016-10-30T00:28:05+5:30
खतप्रकल्पाचा प्रश्न : अटी शिथिल होण्याची अपेक्षा; सुटीच्या दिवशी होणार कामकाज
नाशिक : खतप्रकल्पाच्या दुरवस्थेला जबाबदार धरत राष्ट्रीय हरित लवादाने बांधकाम परवानग्यांसंबंधी लादलेल्या अटी शिथिल करण्याबाबत मनपाने दाखल केलेल्या पुनर्विलोकन याचिकेवर दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोमवार, दि. ३१ आॅक्टोबरला सुनावणी होणार असून, यावेळी महापालिकेकडून प्रगती अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली. लवादापुढे दीर्घ कालावधीनंतर सुनावणी होत असल्याने बांधकाम परवानग्याबाबतचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खतप्रकल्पाच्या दुरवस्थेला जबाबदार धरत राष्ट्रीय हरित लवादाने नोव्हेंबर २०१४ मध्ये शहरातील बांधकाम परवाग्यांना रोख लावला होता. नंतर काही अटी-शर्तींवर बांधकाम परवानग्या देण्याचे निर्देश आले असले तरी जाचक अटींमुळे परवानग्या मिळविणे अवघड होऊन बसले. परिणामी, गेल्या पावणे दोन वर्षांपासून बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे. मनपाने खतप्रकल्पात सुधारणा करण्यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र सादर करत लवादाकडे अटी-शर्ती शिथिल करण्यासाठी पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. परंतु लवादावरील न्यायाधीशांच्या बदल्या झाल्याने याचिकेवरील सुनावणी रखडली होती. तत्पूर्वी, आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अभिषेक कृष्ण यांनी लवादाच्या निर्णयाचा अभ्यास करत खतप्रकल्पाचा आजार बरा करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. खतप्रकल्प खासगीकरणाचा रखडलेला प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवत त्याला मंजुरी घेण्यात आली. आता खतप्रकल्पाच्या खासगीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. (प्रतिनिधी)