एचआयव्हीग्रस्त महिलांची हेळसांड
By admin | Published: January 25, 2015 12:04 AM2015-01-25T00:04:46+5:302015-01-25T00:04:54+5:30
जिल्हा रुग्णालयाची अनास्था : वर्षभरात सोळाशेपैकी केवळ ३९ महिलांची तपासणी
नाशिक : एचआयव्ही संसर्गित रुग्णांचे जीवनमान सुधारावे, आयुमर्यादा वाढावी यासाठी शासनस्तरावरून चांगले प्रयत्न होत असताना जिल्हा प्रशासन आणि आरोग्य सुविधा देणाऱ्या जिल्हा रुग्णालयाकडून मात्र हेळसांड केली जात असल्याचे चित्र आहे़ संसर्गित महिलांची वर्षातून एकदा पॅप स्मेअरची (गर्भाशय) तपासणी करावी, असे शासनाचे आदेश असताना जिल्हा रुग्णालयाकडून तपासणीबाबत टाळाटाळ केली जात आहे़ रुग्णालयाकडून झेड किट, डॉक्टर, लाईट उपलब्ध नसल्याची कारणे सांगितली जात असून, वर्षभरात सोळाशेपैकी केवळ ३९ महिलांचीच तपासणी झाल्याचे माहिती विहार काळजी व आधार केंद्रातर्फे देण्यात आली आहे़
नाशिक जिल्ह्यात चौदा हजार एचआयव्ही संसर्गित रुग्ण आहेत़ देशभरातील रुग्णांसाठी केंद्र सरकारने १ जून २०१३ पासून ‘विहान’ कार्यक्रमाची आखणी केली़ आजमितीस देशभरात ६८९ युनिट कार्यरत असून, महाराष्ट्रात ४२ युनिट आहेत़ त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील विहान काळजी व आधार केंद्रात तीन हजार सहाशे एचआयव्ही संसर्गित रुग्णांची नोंद असून, यामध्ये सोळाशे महिला आहेत़
गर्भाशयाचा कॅन्सर तसेच टीबी या कारणांमुळे महिलांच्या मृत्यू अधिक होत असल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने त्यांनी संसर्गित महिलांच्या गर्भाशयाची तपासणी करण्याचे आदेश दिले़ मात्र ही तपासणी करण्यास जिल्हा रुग्णालयाकडून टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार महिलांकडून केली जाते आहे़
जिल्हा रुग्णालयात पहिल्या व तिसऱ्या शनिवारी या एचआयव्ही संसर्गित महिलांची तपासणी केली जाते़ यासाठी एकावेळी केवळ पाच म्हणजेच महिन्यात दहाच महिलांची तपासणी केली जाते़ त्यातही तपासणीसाठी आवश्यक असलेले झेड किट नाही, डॉक्टर बाहेरगावी गेले आहेत, लाईट गेलेली आहे अशी कारणे सांगून टाळाटाळ केली
जाते़
विशेष म्हणजे जिल्हा शासकीय रुग्णालयात सोळाशे महिलांपैकी केवळ ३९ महिलांचीच वर्षभरात तपासणी करण्यात आली आहे़ त्यामुळे उर्वरित महिलांची कधी तपासणी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे़ या रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ मिळतो मात्र जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ११७ प्रकरणे प्रलंबित
आहेत़
जिल्हा एड्स नियंत्रण व काळजी समितीची बैठक २७ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात होत असून, एचआयव्ही संसर्गित महिला व पुरुषांचे विविध आरोग्य व अडचणींबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी विहान काळजी व आधार केंद्राच्या वतीने करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)