गट-गण हरकतींवर आज सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 01:20 AM2022-06-13T01:20:59+5:302022-06-13T01:21:23+5:30
जिल्हा परिषदेच्या गट-गण प्रारूप रचनेवर प्राप्त झालेल्या हरकतींवरील सुनावणी सोमवारी (दि.१३) रोजी विभागीय आयुक्तांकडे होणार असून, या हरकतींकडे तालुक्यांचे लक्ष लागले आहे. यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर हरकती आल्या असल्याने त्यावर होणारा निर्णयदेखील महत्त्वाचा मानला जात आहे. गट-गण रचनेवर जवळपास ९३ हरकती, सूचना दाखल झाल्या आहेत.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या गट-गण प्रारूप रचनेवर प्राप्त झालेल्या हरकतींवरील सुनावणी सोमवारी (दि.१३) रोजी विभागीय आयुक्तांकडे होणार असून, या हरकतींकडे तालुक्यांचे लक्ष लागले आहे. यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर हरकती आल्या असल्याने त्यावर होणारा निर्णयदेखील महत्त्वाचा मानला जात आहे. गट-गण रचनेवर जवळपास ९३ हरकती, सूचना दाखल झाल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या ८४ गट आणि पंचायत समितीच्या १६८ गणांच्या प्रारूप रचनेवर विक्रमी हरकती दाखल झाल्या आहेत. प्रारूप रचनेनुसार जिल्ह्यात ११ गट आणि २२ गण वाढले असून, या प्रारूप रचनेवर ८ जूनपर्यंत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. जिल्हाभरातून ९३ हरकती आणि सूचना दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर सोमवारी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्तांकडेच सुनावणी हेाणार आहे. गट-गणातील प्रारूप आराखडा बदलण्याच्या हरकती अनेकांकडून घेण्यात आल्या आहेत, तर त्याच गट-गणांबाबत बदल करण्यात येऊ अशा विरुद्ध सूचनादेखील करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अशा गट-गटांच्या बाबतीत तसेच गावांच्या समावेशाबाबत होणारा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या प्रारूप प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसाठी गटाची व पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभागरचनेच्या कार्यक्रमाची अधिसूचना दि. २ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार ८ जूनपर्यंत प्रारूप प्रभागरचनेवर हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या होत्या.