नामपूर ग्रामीण रूग्णालयात रूग्णांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 06:44 PM2019-05-10T18:44:07+5:302019-05-10T18:44:46+5:30
नामपूर : करोडो रु पये खर्च करून बांधलेल्या येथील ग्रामीण रु ग्णालयात एकही वैद्यकिय अधिकारी नसल्यामूळे रूग्णांची गैरसोय होत आहे. दि. १७ मे पर्यत मंजूर असलेले चार वैद्यकिय अधिकारी अद्याप मिळालेले नसून या रुग्णालयाला कोणीच वाली नसल्याच्या भावना रुग्णांकडून व्यक्त होत आहेत.
नामपूर येथील ग्रामीण रूग्णालय हे सोळा गाव काटवन मधील रु ग्णांना आरोग्य सेवेसाठी मध्यवर्ती ठिकाण असून या रु ग्णालयात रोज दोनशेहून अधिक रुग्णांची तपासणी केली जाते. अनेक दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. तसेच गंभीर रु ग्णांना औषधोपचार मिळत नसल्यामुळे अशा रुग्णांना संकटांचा सामना करावा लागत आहे. नामपूरच्या ग्रामिण रु ग्णालयात एकूण २५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त १४ पदे भरलेली असून १४ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिक्षक वर्ग एकचे हे महत्वपूर्ण पद रिक्त असून वैद्यकीय अधिकारी ही तीन पदे मंजूर असून तेही पदे रिक्त आहेत. लाखो रु पये किंमतीचे क्ष किरण मशीन अनेक वर्षापासून उपलब्ध आहे मात्र तंत्रज्ञ हे पद रिक्त असल्याने सदर महागडे मशीन अक्षरश: धूळ खात पडून आहे. त्यामुळे सुविधा उपलब्ध असूनही रु ग्णांना मालेगावी जावे लागत आहे.
फेब्रुवारी महिन्यात १०८ नंबरची रु ग्णवाहिका नाशिकला जात असतांना शॉर्टसर्किटमुळे पुर्णत: जळाली. त्यानंतर रूग्णालयाला नविन रुग्णवाहिका अद्याप मिळालेली नाही. येथील रु ग्ण समितीचे पदाधिकारी प्रा. गुलाबराव कापडणीस यांनी वारंवार रिक्त पदे भरण्याची मागणी केली मात्र अद्याप कार्यवाही होत नसल्यामूळे शुक्रवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सहाय्यक अधिक्षक, कनिष्ठ लिपीक, सफाईदार , शिपाई, कक्ष सेवक, क्ष किरण तंत्रज्ञ ही पदेही रिक्त आहेत. ग्रामीण रु ग्णालयात सचिन कंकरेज, विनोद सावंत, गुलाबराव कापडणीस, नकुल सावंत, रवि देसले, प्रविण सावंत, समिर सावंत, किरण अहिरे, अशोक पवार, नारायण सावंत, आदिंनी दादा भुसे यांच्याशी संपर्कसाधून ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांची माहिती दिली. १५ तारखेपर्यत तीन वैद्यकीय अधिकारी नामपूरला देण्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा करेल असे आश्वासन भुसे यांनी दिले.