देवस्थान जमिनीबाबत लवकरच सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:13 AM2021-03-20T04:13:49+5:302021-03-20T04:13:49+5:30
यासंदर्भात मुंबईत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बेलतगव्हाण, विहितगाव, मनोली गावातील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवर बालाजी देवस्थानाचे ...
यासंदर्भात मुंबईत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बेलतगव्हाण, विहितगाव, मनोली गावातील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवर बालाजी देवस्थानाचे नाव मालक सदरी लागल्याने अनेकांना जागा विक्री अथवा विकसित करता येत नाही. तिन्ही गावांच्या शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनींच्या सातबारा उताऱ्यांवर १९७२ च्या महाराष्ट्र शासन परिपत्रकाच्या आधारे सन १९७३-७४ मध्ये तहसीलदारांच्या आदेशानुसार श्री व्यंकटेश बालाजी संस्थान, नाशिक यांच्या नावाची नोंद करण्यात आली. सदर संस्थानचे नाव सातबारा उताऱ्यावरून कमी करून इतर अधिकारातील इनाम वर्ग -३ व भोगवटदार २ हे शेरे कमी करण्यासाठी या गावांतील शेतकऱ्यांनी गेली तीन ते चार वर्षांपासून शासन दरबारी निवेदने, अपील अर्ज दाखल केलेले आहेत. या अपिलावर महसूलमंत्र्यांकडे सुनावणी सुरू असून, दोन्ही बाजूच्या वकिलांनी तसेच शेतकऱ्यांनी व देवस्थानाच्या विश्वस्तांनी आपली बाजू मांडली आहे. लवकरच या प्रकरणांची सुनावणी करण्यात येईल, असे आश्वासन थोरात यांनी यावेळी दिले.
बैठकीस खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज आहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, तहसीलदार अनिल दौंडे, योगेश घोलप, निवृत्ती अरिंगळे, सोमनाथ बोराडे, ॲड. नरेश गुगळे, विक्रम कोठुळे, ॲड दीपक पाळदे, संजय कोठुळे, सुनील धुर्जड, अनिल बोराडे उपस्थित होते.