८० कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:22 AM2018-05-06T00:22:14+5:302018-05-06T00:22:14+5:30
नायगाव : वाढत्या उष्णतेमुळे माणसांबरोबर पशु-पक्ष्यांच्या जिवाचीही काहिली होत असून, सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे अतिउष्णतेमुळे ऐंशी गावठी कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
नायगाव : वाढत्या उष्णतेमुळे माणसांबरोबर पशु-पक्ष्यांच्या जिवाचीही काहिली होत असून, सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे अतिउष्णतेमुळे ऐंशी गावठी कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाच्या झळांनी अक्षरश: अंग भाजून निघत आहे. अशा वातावरणामुळे अंगाची लाही लाही होत आहे. अतिउष्णतेमुळे पशुपक्ष्यांचेही हाल होत आहेत. तालुक्यातील जायगाव येथील रमेश पोपट हुल्लारे यांच्या ३०, सुरेश आनंदा गायकवाड यांच्या २५, तर इंदूबाई मोहन लहाने यांच्या २८ कोंबड्या अशा एकूण ८३ गावठी कोंबड्यांचा मृत्यू झाला.
दिवसागणिक वाढत्या उष्णतेच्या झळांनी सकाळपासूनच अंगातून घामांच्या धारा सुरू होण्यास घालमेल सुरुवात होते अशा जिवाची होणाऱ्या वातावरणात पशुपक्ष्यांच्या जिवाची काहिली होत आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी अंग भाजून निघत आहे. अशा परिस्थितीत मोठ्या मेहनतीने जनावरांची काळजी घेण्याचा सल्ला जाणकार देत असले तरी वातावरणातील उष्णतेमुळे सर्वच उपाय फिके पडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. नायगाव परिसरात गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेळ्या, मेंढ्या व गायीवासरांची शिकार पाठोपाठ उष्माघाताने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने परिसरातील पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐंशी ते नव्वद कोंबड्या दगावल्याने सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.