प्रचंड उष्म्याचा कांद्याला तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 01:06 AM2022-05-21T01:06:26+5:302022-05-21T01:06:50+5:30
वातावरणातील प्रचंड उष्म्याचा कांदा पिकालाही तडाखा बसत असल्यामुळे कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसात कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने शेतकरी वर्ग दुष्टचक्रात सापडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या संयमाचा बांध फुटून शेतकरी रस्त्यावर येत आक्रमक होताना दिसून येत आहेत.
पिंपळगाव बसवंत/लासलगाव : वातावरणातील प्रचंड उष्म्याचा कांदा पिकालाही तडाखा बसत असल्यामुळे कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसात कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने शेतकरी वर्ग दुष्टचक्रात सापडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या संयमाचा बांध फुटून शेतकरी रस्त्यावर येत आक्रमक होताना दिसून येत आहेत.
शुक्रवारी (दि.२०) लासलगाव बाजार समितीत ९७८ वाहनांतील १८ हजार ४१० क्विंटल उन्हाळ कांद्याला किमान ५०० ते १,३५५ व सर्व साधारण ८८० रुपये भाव जाहीर झाला. नाफेडची कांदा खरेदी सुरू असतानाही भाव कमी झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला कमी दर मिळत आहे. त्यामुळे कांद्यातून नफा तर सोडाच पण, वाहतूक खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. त्यात देशमाने येथील शेतकऱ्याच्या गोल्टी स्वरूपातील कांद्याला ५१ रुपये क्विंटल बाजारभाव मिळाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी निषेध केला.
इन्फो
बाजार समितीचे आवाहन
सध्या कांदा उत्पादकांनी कांदा साठवणुकीस सुरुवात केली आहे. उष्णतेमुळे कांद्याची प्रत खराब होत आहे. साठवणुकीनंतर उर्वरित कांदा शेतकरी लिलावासाठी बाजार समितीत आणत आहे. उष्णतेमुळे कांद्याची प्रत घसरल्याने कांद्याला अपेक्षित भाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून लिलावासाठी आणल्यास योग्य बाजारभाव मिळतील, असे आवाहन लासलगाव बाजार समितीतर्फे करण्यात आले.
इन्फो
पिंपळगावी नाराजीचा सूर
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पिंपळगावी कांद्याला कमीत कमी ६०० व जास्तीतजास्त १६००, तर सरासरी ९५० रुपये दर मिळत आहे. गोल्टी सारखा कांदा कवडीमोल झाला आहे.
यंदा उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली असून त्या तुलनेत मागणी आणि दरात तफावत आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याचे सौदे होतात पण दुय्यम आणि निकृष्ट दर्जाचा कांदा शेतकरी जागेवर सोडून जात आहेत.
इन्फो
नाफेडच्या चौकशीची मागणी
देवळा : मोठा गाजावाजा करीत कांदा खरेदीसाठी उतरलेल्या नाफेडने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला. नाफेडमार्फत होणारी खरेदी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी मनस्ताप देणारी ठरली. नाफेडच्या गैरकारभाराची चौकशीची मागणी स्वतंत्र भारत पक्ष व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. नाफेड ही एक बहुराज्य सहकारी संस्था असून केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून शेतमालाची खरेदी करून शेतकऱ्यांना किमान दर देण्याचा प्रयत्न करते. कांद्याचे कोसळणारे दर सावरण्यासाठीच शासनाने नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू केली आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या कांदा खरेदीबाबत अतिशय गोपनीयता पाळली जात आहे. नाफेडमार्फत खरेदी होणाऱ्या कांद्याला सर्वत्र एकच दर न ठेवता वेगवेगळे दरात खरेदी सुरू असल्यामुळे विविध शेतकरी संघटना, कांदा उत्पादक शेतकरी यांच्यात संभ्रमाचे वातावरण आहे.