नांदूरशिंगोटे परिसरात आर्द्रा नक्षत्राची मुसळधार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 11:59 PM2021-06-28T23:59:12+5:302021-06-28T23:59:36+5:30
नांदूरशिंगोटे : तब्बल वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात आर्द्रा नक्षत्रातील पावसाने दुपारी चार वाजेच्या सुमारास ...
नांदूरशिंगोटे : तब्बल वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात आर्द्रा नक्षत्रातील पावसाने दुपारी चार वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लांबणीवर पडलेल्या खरीप हंगामातील पेरण्यांना मदत होणार आहे. सुमारे तासभराहून अधिक काळ सुरु असलेल्या पावसाने सर्वत्र पाणी साचले होते.
नांदूरशिंगोटे येथे व परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. मृग नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. दोन दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्मा असल्याने बळीराजा पावसाची वाट पाहत होता. रविवारी सायंकाळी व सोमवारी दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून बळीराजा आतुरतेने पावसाची वाट पाहात होता. सोमवारी दुपारपासूनच आकाशात ढग दाटून आल्याने ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मान्सूनपूर्व पावसाच्या पाण्यावर काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकाची पेरणी व लागवड केली होती. तर काही भागात पावसाने हुलकावणी दिल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. या अगोदर काही प्रमाणात ज्या पेरण्या झाल्या आहेत, त्या पिकांना देखील झालेल्या पावसाने जीवदान मिळाले आहे. अचानक आलेल्या पावसाने सर्वच पाणीच पाणी झाले होते. तर शेतात पाण्याचे तळे तयार झाल्याचे चित्र होते. रस्त्यावरुन तसेच रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहत असल्याने परिसर जलमय झाला होता.
--------------------
पावसाने परिसराला झोडपले
नांदूरशिंगोटे व परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भोजापूर खोरे परिसरातील चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी तसेच दापूर परिसरातील चापडगाव, दोडी, दापूर, गोंदे, माळवाडी, मानोरी, कणकोरी आदी भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिसरात तब्बल दीड तास पाऊस पडला. शेतात सर्वत्र पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. दापूर परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर पुन्हा आर्द्रा नक्षत्रातही या भागाला झोडपले आहे त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. तर काही भागात मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे.
--------------
फोटो ओळी : सिन्नर तालुक्यातील दापूर व भोजापूर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जलमय झालेले शेत. (२८ नांदूरशिंगोटे १/२/३)