जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 12:50 AM2021-05-29T00:50:46+5:302021-05-29T00:52:06+5:30
जिल्ह्यातील निफाड, देवळा, कळवण, येवला तालुका परिसरात शुक्रवारी (दि. २८) साडेचार वाजेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह झालेल्या या पावसाने काही भागात वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे वाहतूककोंडी बघायला मिळाली. पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्याही घटना घडल्या. आंबा मोठ्या प्रमाणावर गळून पडल्याने नुकसान झाले. शेतकऱ्यांचीही तारांबळ उडाली.
नाशिक : जिल्ह्यातील निफाड, देवळा, कळवण, येवला तालुका परिसरात शुक्रवारी (दि. २८) साडेचार वाजेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह झालेल्या या पावसाने काही भागात वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे वाहतूककोंडी बघायला मिळाली. पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्याही घटना घडल्या. आंबा मोठ्या प्रमाणावर गळून पडल्याने नुकसान झाले. शेतकऱ्यांचीही तारांबळ उडाली.
पाटोद्यात तडाखा
पाटोदा : पाटोदा परिसरातील ठाणगाव पिंपरी, कानडी, विखरणी, आडगाव रेपाल, मुरमी, विसापूर कातरणी या गावात शुक्रवारी दुपारी मान्सूनपूर्व पावसाने वादळीवारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच वातावरणात बदल होऊन उकाडा वाढला होता. पाऊस जोरात असल्याने अगदी काही वेळातच शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. पावसामुळे शेतात पोळी लावून ठेवलेला कांदा तसेच खळ्यावर असलेला जनावरांचा चारा तसेच चाऱ्याची कुटी झाकण्यासाठी शेतकरीवर्गाची तारांबळ उडाली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर शेताच्या बांधावर असलेल्या गावरान आंब्यालाही मोठा फटका बसला आहे. कांदा बियाणांसाठी असलेल्या डोंगळा पिकालाही याचा फटका बसला
आहे.
साकोरेत रस्ता बंद
कळवण : तालुक्यात शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. नाशिक रस्त्यावरील साकोरे गावाजवळ विजेच्या खांबावर झाड पडले. या वेळी वीजपुरवठा खंडित होऊन काही तास वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर झाड पडल्यामुळे कळवण व नाशिक रस्त्यावर दुतर्फा वाहने अडकून पडली. रस्ता बंद असल्यामुळे पोकलॅन्डच्या सहाय्याने रस्त्यावरील झाड बाजूला करण्यात साकोरे ग्रामस्थांना यश आले. कळवण शहरात सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. दुपारी पावणेपाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनेक सकल भागांत पाणी साचले. शहरातील मेन रोड रस्त्याचे काम सध्या संथगतीने चालू आहे. रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी रस्ता खोदकाम, गटार खोदकाम केलेले आहे. तेथे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. तर तालुक्याच्या ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
शेमळीत वीजपुरवठा खंडित
जुनी शेमळी : येथील परिसरात सायंकाळी तीनच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची व नागरिकांची धावपळ उडाली. पावसामुळे गावातील श्रीराम मंदिरासमोरील वृक्ष उन्मळून पडल्यामुळे विद्युत खांबावरील तारा तुटल्या. त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. बाहेर कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. तत्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत केला. आंब्याचीही मोठ्या प्रमाणात गळती झाली. वादळी वाऱ्यामुळे सटाणा, मालेगाव रस्त्यावरही वृक्ष उन्मळून पडले.
निफाड, देवळ्यात हजेरी
निफाड : निफाड व परिसरात शुक्रवारी (दि.२८) दुपारी मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. नाशिक-औरंगाबाद महामार्गावर चांदोरी येथील खरात पेट्रोलियमजवळ महामार्गावर झाड कोसळले. यामुळे जवळपास दीड तास वाहतूक खोळंबली होती.
पिंपळगाव वाखारीत पाऊस
पिंपळगाव वाखारी : पिंपळगाव वाखारी परिसरात रोहिणी नक्षत्राच्या प्रथम चरणात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतात साठवलेला कांदा व चाऱ्याचे काही प्रमाणात नुकसान झाले असून शेतात पाणी साचल्याने शेतांना तळ्यांचे स्वरूप आले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी मशागतीसाठी होणार आहे. पावसामुळे परिसरात शेतकामांना वेग येणार आहे.
रिक्षावर झाड पडल्याने दाम्पत्य जखमी
मालेगाव मध्य : शहरातील बापू गांधी कपडा बाजार, अय्युबनगर भागात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बेमोसमी पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरले होते. नागरिकांनी स्वतः गटारींची सफाई केल्याने पाण्याचा निचरा झाला. याच
भागात झाड उन्मळून पडल्याने एका प्रवासी रिक्षासह दुचाकीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने रिक्षात बसलेल्या दाम्पत्याला किरकोळ दुखापत झाली. विजेच्या खांबावर झाड पडल्याने खांब वाकला आहे. विजेच्या तारा तुटल्याने परिसरात अंधार पसरला आहे. शहरातील अनेक भागात स्वच्छतेअभावी गटारी तुडुंब भरल्याने अनेक भागात पाणी साचले होते. पावसाळ्यापूर्वी शहरातील गटारींसह मुख्य नाल्यांची सफाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली
आहे.