जिल्ह्यात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:32 AM2018-08-18T01:32:06+5:302018-08-18T01:32:32+5:30
तीन आठवड्यांहूनही अधिक काळ दडी मारून बसलेल्या पावसाचे जिल्ह्यात सर्वदूर फेरआगमन झाल्याने सर्वत्र उल्हासाचे वातावरण निर्माण झाले असून, दुबार पेरणीच्या संकटात सापडलेला शेतकरी आनंदला आहे.
नाशिक : तीन आठवड्यांहूनही अधिक काळ दडी मारून बसलेल्या पावसाचे जिल्ह्यात सर्वदूर फेरआगमन झाल्याने सर्वत्र उल्हासाचे वातावरण निर्माण झाले असून, दुबार पेरणीच्या संकटात सापडलेला शेतकरी आनंदला आहे. गुरुवारी दिवसभर कमीअधिक प्रमाणात कोसळलेल्या पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले तर धरणाच्या साठ्यातही कमालीची वाढ झाल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून १२ धरणांतून पाण्याचे विसर्ग करण्यात आले आहे. दरम्यान, येत्या चार दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जिल्ह्यातील पूर्वभागातून एक्झिट घेतल्यामुळे शेतकºयांचे तोंडचे पाणी पळाले होते. पावसाच्या भरवशावर पेरणी केलेल्या शेतकºयांची पिके करपू लागल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असताना गुरुवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ८१४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यात १०१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्या खालोखाल सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथे पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे आॅगस्टच्या दुसºया आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पाऊस न पडलेल्या नांदगाव, मालेगाव, येवला, सिन्नर, निफाड, देवळा, बागलाण, चांदवड या तालुक्यांनाही पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रतीक्षेत असलेला मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, तूर पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पावसामुळे ग्रामीण भागातील नद्या, नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली तर धरणाच्या साठ्यातही कमालीची वाढ झाली आहे. जिल्ह्णातील २४ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये ६८ टक्के जलसाठा झाला असून, त्यातील पाच धरणे शंभर टक्के फुल्ल झाल्याने त्यातून विसर्ग करण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने आळंदी, भावली, हरणबारी, केळझर, वाघाड यांचा समावेश आहे. पावसाच्या सर्वदूर हजेरीमुळे गंगापूर धरण समूहात ९२ टक्के, पालखेड धरण समूहात ९३, दारणा समूहात ८० टक्के, गिरणा खोºयात ४० टक्के पाणी साठले आहे. काही धरणे ९० टक्क्यांपेक्षा अधिक भरल्यामुळे पाटबंधारे खात्याने त्यातून विसर्ग सुरू केला आहे. त्यात प्रामुख्याने गंगापूर, वाघाड, दारणा, पालखेड, करंजवण, पुणेगाव, भावली, वालदेवी, चणकापूर, हरणबारी, केळझर व नांदुरमधमेश्वर धरणाचा समावेश आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नद्या, नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.