शहर परिसरात अर्धा तास कोसळला मुसळधार पाऊस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:26 AM2020-09-20T01:26:53+5:302020-09-20T01:29:15+5:30
ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह शनिवारी (दि.१९) दुपारी शहर व परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. क्षणार्धात मुसळधार सरी कोसळू लागल्याने सर्व परिसर जलमय झाला होता. शहरातील सखल भागात असलेल्या बाजारपेठांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. केवळ अर्धा तास झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहत होते.
नाशिक : ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह शनिवारी (दि.१९) दुपारी शहर व परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. क्षणार्धात मुसळधार सरी कोसळू लागल्याने सर्व परिसर जलमय झाला होता. शहरातील सखल भागात असलेल्या बाजारपेठांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. केवळ अर्धा तास झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहत होते. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात ६.६ मिलीमीटरपर्यंत पाऊस पडल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्रात झाली.
शनिवारी सकाळी प्रखर ऊन पडले होते, मात्र दुपारी बारा वाजेपासून ढगाळ हवामान तयार होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पाऊस जोरदार हजेरी लावेल असा अंदाज नागरिकांना आला. दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरासह विविध उपनगरांना पावसाने जोरदार तडाखा दिला. साधारणत दीड ते पावणेदोन वाजेपर्यंत चाललेल्या धुवाधार पावसाने शहर जलमय झाले. मनपाच्या भूमिगत गटारी तुडुंब भरून वाहू लागले होते. सर्वच रस्त्यांवर पाणी पाणी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
शहरातील मेनरोड, दहीपूल, भद्र्रकाली, सरस्वती लेणे, दूध बाजार आदी सकल परिसरात पावसाचे पाणी साचले होते. येथील भूमिगत गटारी तुडुंब भरल्याने रस्त्यांवर जणू तलाव निर्माण झाल्याचे चित्र नेहमीप्रमाणे पहावयास मिळाले.
सातपूरला वादळी पावसात विद्युत तार तुटली; अनर्थ टळला
सातपूर गावात अतिशय वर्दळीच्या ठिकाणी शनिवारी झालेल्या वादळात झाडालगत असलेल्या महावितरणची जिवंत तार तुटून खाली पडली. त्यामुळे प्रचंड स्फोट झाला. व्यापारी व्यावसायिक, ग्राहक, नागरिक सैरावैरा पळालेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सातपूर गावातील व्यापारी मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सातपूर सोसायटीलगत पिंपळाचे झाड आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास या झाडाची फांदी तुटून विद्युत तारेच्या लाइनवर पडली आणि भला मोठ्ठा स्पोट झाल्याने झाडाने पेट घेतला. जाळाने विद्युत तार तुटून दुकानांवर पडली. आग आणि मोठ्या आवाजाने गर्दीतले नागरिक सैरावैरा पळालेत. या अचानक घडलेल्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हा भाग झाला जलमय
अवघ्या अर्ध्या तासात जुने नाशिक भागातील सारडा सर्कल, दूधबाजार, भद्र्रकाली, तिवंधा लेन, कानडे मारुती लेन या भागांतील सर्व रस्ते पाण्याखाली गेले. दुपारी दोन वाजेपर्यंत दहीपूल, सराफ बाजार, नेहरू चौक, भांडी बाजार, राजेबहाद्दर लेन परिसर जलमय झाला होता. पावसाने बाजारपेठेत तारांबळ उडाली होती. नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प, डीजीपीनगर-१, वडाळागाव, पाथर्डी फाटा, सिडको, अंबड, सातपूर परिसरातदेखील जोरदार पाऊस झाला.