वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:13 AM2021-05-17T04:13:14+5:302021-05-17T04:13:14+5:30
नाशिक: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम नाशिक शहरात दुपारनंतर दिसून आला. शहरातील बहुतेक भागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी ...
नाशिक: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम नाशिक शहरात दुपारनंतर दिसून आला. शहरातील बहुतेक भागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या तर रस्त्यावरील होर्डिग्जही देखील कोसळण्याच्या घटना घडल्या. पोलिसांसाठी बांधण्यात आलेले कापडी मंडपही उद्ध्वस्त झाले. समुद्रातील ’तौक्ते’ या चक्रीवादळाच्या प्रभावाने वातावरणात बदल होऊन नाशिक शहर परिसरात जोरदार वाऱ्यासह अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसेळल्या. रविवारी पहाटेच्या सुमारास पावसाचा शिडकावा झाल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दुपारी साडेअकारा वाजेनंतर ऊन-सावलीचा खेळ सुरू झाला. दुपारी २ वाजेनंतर शहरातील अनेक भागात जोरदार वारे वाहू लागल्यानंतर काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. नाशिकरोड, उपनगर, इंदिरानगर, पंचवटी, सिडको, पाथर्डी या भागात काहीवेळ जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना गार वाहणाऱ्या वाऱ्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला.
वादळी वाऱ्यामुळे शरणपूरोड, गंगापूररोड, सातपूर, सिडकोसह, पंचवटी तसेच नाशिकरोड परिरसरात वीजपुरवठादेखील काही काळ विस्कळीत झाला होता. कोठेही मोठा बिघाड झाला नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. गंगापूररोड, त्र्यंबकरोड तसेच द्वारका ते दत्तमंदिर दरम्यान काही झाडांच्या फांद्या पडल्याचे दिसून आले. झोपडपट्टीतील अनेक घरांचे पत्रे उडाल्याने त्यांची धांदल उडाली.
दरम्यान, बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या निवाऱ्यासाठी ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या कापडी मंडप वाऱ्याने उडून गेले तसेच त्यांची पडझडही झाली. रस्तयावर लावण्यात आलेले फलक त्याचप्रमाणे काही होर्डिग्जदेखील पडले.
नाशिक जिल्ह्याला चक्रीवादळाचा फटका बसणार नसल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात असले तरी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली असून आपत्ती यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे तर जिल्हा नियंत्रण कक्ष देखील स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षाच्यावतीने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.