नाशिकमध्ये दमदार पाऊस : त्र्यंबकमध्ये ६२ तर इगतपूरीत ६५ मि.मि.पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 02:39 PM2017-08-20T14:39:30+5:302017-08-20T14:42:19+5:30
शहरासह जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून ग्रामिण भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या दोन तालुक्यांमध्ये विश्रांतीनंतर पावसाची विक्रमी नोंद झाली
नाशिक : शहरासह जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून ग्रामिण भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या दोन तालुक्यांमध्ये विश्रांतीनंतर पावसाची विक्रमी नोंद झाली असून त्र्यंबकेश्वर तालुक्यात ६२ मि.मि. इगतपूरी ६६ मिमि. तर नाशिक शहरात ३२ मि.मि पाऊस सकाळी अकरा पर्यंत झाल्याची नोंद येथील हवामान निरिक्षण कार्यालयाने केली आहे. दिंडोरी २२ मि.मि. इतका पाऊस झाला. एकूणच धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्यामुळे गंगापूर धरणसमुहातील गौतमी, काश्यपी, आळंदी या धरणांसह मुख्य गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग वाढविला जात आहे. सकाळी अकरा वाजेपासून विसर्ग करण्यास सुरूवात करण्यात आली. प्रारंभी एक हजार क्युसेक त्यानंतर दोन तासांनी दोन हजार क्युसेक आणि दुपारी दोन वाजता ४६८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. नदीपात्रात धरणातून सध्या ४६८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
यामुळे नदीकाठालगत रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सुरू झालेल्या विसर्गामुळे नदीचा जलस्तर वाढला आहे. रामकुंडावरील अहल्यादेवी होळकर पूलाखालून सुमारे पाच हजार क्युसेक पाणी पुढे रामकुंडामध्ये प्रवाहीत होते. यामुळे गोदावरीवरील लहान पुल, लहान मंदिरे पाण्याखाली गेली. गंगापूर धरणातून विसर्ग वाढल्याने सोमेश्वर मंदिराजवळील दुधसागर धबधबा खळाळला आहे. रविवारची सुटी असल्यामुळे नाशिककरांनी विशेषत: तरुणाईने धबधबा परिसरात गर्दी केली होती.
असा वाढला पावसाचा जोर
मध्यरात्री अडीच वाजता १०.०मि.मि.
अडीच ते पहाटे साडेपाच वाजेपर्यंत ४.६ मि.मि.
साडे पाच ते सकाळी साडे आठ वाजेपर्यंत १५.० मि.मि.
साडे आठ ते सकाळी अकरा पर्यंत ३.मि.मि