अभोणा परिसरात जोरदार पाऊस,पिकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 06:16 PM2020-07-26T18:16:46+5:302020-07-26T18:23:07+5:30
अभोणा : दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि.२५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली सुमारे तासभर कोसळलेल्या या पावसाने धोक्यात आलेल्या खरीपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे.
अभोणा : दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि.२५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली सुमारे तासभर कोसळलेल्या या पावसाने धोक्यात आलेल्या खरीपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. जूनच्या प्रारंभीच निसर्ग वादळामुळे सलग तीन दिवस पावसाने संततधार धरली होती.या पावसावर शेतकऱ्यांनी मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणावर लागवड केली तर, पश्चिम आदिवासी पट्यात भात, नागलीची रोपे टाकण्यात आली होती. समाधानकारक पावसाने खरिप पिकांसह रोपेही जोमात होती. मात्र गत पंधरवाडयापासून पावसाने ओढ दिल्याने पिके वाळू लागली होती तर भात, नागलीची लावणीही लांबली त्यातच रोपेही पिवळी पडू लागल्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांची पावसाने अधिकच चिंता वाढवली. मात्र शनिवारच्या समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, तालुक्यात आजपर्यंत २७९ मि मि पाऊस झाला असून शनिवारी १८ मि मी पावसाची नोंद झाली तर चणकापूर धरणक्षेत्रात २५ मि मि पाऊस झाला असून आजपर्यंत २७२ मि मि पावसाची नोंद झाली आहे आजमितीस धरणात ५२३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. अभोणा मंडळ मध्ये ३५ मिमी पाऊस पडला.
दरम्यान या पावसाने शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते तर, गावातील सिमेंटच्या रस्त्यास ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामपालीका प्रशासनाने तात्काळ खड्डे बुजवावेत अशी मागणी केली जात आहे.