जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:16 AM2021-08-22T04:16:46+5:302021-08-22T04:16:46+5:30
दिंडोरी/लखमापूर : जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाचा जोर कायम असून, शेतीपिकांना संजीवनी मिळाली असून, धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ...
दिंडोरी/लखमापूर : जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाचा जोर कायम असून, शेतीपिकांना संजीवनी मिळाली असून, धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दिंडोरी तालुक्यात अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली होती. मात्र, दोन दिवसांपासून पावसाचे तालुक्यात पुनरागमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
दिंडोरी तालुका हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात पर्जन्यमान जास्त असल्याने जून-जुलैमध्येच धरणांमधून निसर्ग सोडला जातो. मात्र, या वर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धरणांनी तळ गाठला होता. १५ ऑगस्टपासून तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पालखेड धरणामध्ये ८० टक्के पाणीसाठा झाल्याने कादवा नदीपात्रात धरणांतील गेट क्रमांक १ व १४ मधून ३९१ क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे, तर वाघाड धरणामध्ये ६२ टक्के पाणीसाठा झाला आहे.
------------------------
पालखेडमधून विसर्ग
धरणांच्या पाणी पातळीत काही प्रमाणत वाढ झाल्याने पालखेड धरणातून गुरुवारी सायंकाळी ३९१ क्युसेक्सने विसर्ग कादवा नदीत सोडण्यात आला होता. मात्र, शनिवारी व रविवारी झालेल्या पावसाने कोलवण, धामण व कादवा नदीला पाणी आल्याने पालखेडच्या पाणी पातळीत ३० टक्क्यांनी वाढ झाल्याने पाणी सोडण्यात आले. वाघाड धरणात मागील आठवड्यात ५० टक्के पाणी होते. त्यात वाढ होऊन ६२ टक्के झाले आहे, शनिवारपर्यंत निरंक असलेल्या तिसगाव धरणाच्या पाणीसाठ्यातही थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे,
.---------------------
पाणीसाठा राखीव
मागील वर्षीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याने, तालुक्यातील पालखेड धरणावर येवला तालुका, मनमाड शहर व ४४ गावे यांसह ओझर, साकोरे, मोहाडी, जानोरी, जऊळके दिंडोरी, पाचगाव पाणीपुरवठा योजना पिंपळगाव बसवंत, पालखेड बंधारा, कोराटे, खडक सुकेणे, अक्राळे, राजारामनगर, कादवा कारखाना, एमआयडीसी पालखेड, या पाणीयोजना अवलंबून आहे. या धरणात ४४८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. करंजवन धरणावर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नसून, या धरणातील पाणी पालखेड धरणात सोडले जाते. ओझरखेड धरणावर कसबे वणी, दिंडोरी शहर, चांदवड व ४४ गावे, पाणी योजना अवलंबून आहे. तिसगाव धरणावर बोपेगाव, खेडगाव या गावांची पाणी योजना अवलंबून आहे. वाघाड धरणावर उमराळे बुद्रुक, हातनोरे, निळवंडी, पाडे, वलखेड या गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे, तर पुणेगाव धरणावर एकही पाणी योजना कार्यान्वित नसून दहा टक्के पाणीसाठा पिण्यासाठी राखीव आहे. सहाही धरणाच्या साठ्यात वाढ होत असल्याने, पाणी योजनांना संजीवनी मिळाली आहे.
-----------------------
पालखेड धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात चांगला पाऊस होत असून, त्यामुळे पाणलाेट क्षेत्रातील नदी व नाल्यांद्वारे घरणात पाण्याची आवक वाढली असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. पालखेड धरणाच्या गेटमधून कादवा नदीत सोडल्याने दिंडाेरी व निफाड तालुक्यातील कादवा नदी काठच्या दाेन्ही तीरांवरील लाेकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
- सुदर्शन सानप, शाखा अधिकारी, पालखेड धरण
-----------------------
...मांजर पाडा प्रकल्पात पाणी येण्यास सुरुवात:
तालुक्यात काही ठिकाणी हलका व काही ठिकाणी मध्यम स्वरूपांचा पाऊस पडत असल्याने मांजर पाडा (देवसाणा) प्रकल्पात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील पुणेगाव धरणांत यामुळे लवकर पाणी येण्याची चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे ओझरखेड व तिसगाव धरण भरण्यास मदत होणार आहे. (२१ दिंडोरी मांजरपाडा)
--------------------
दिंडोरी तालुक्यातील धरणांमधील सध्याचा उपलब्ध पाणीसाठा:-
(१९ ऑगस्ट, २०२१)
(दशलक्ष घनफूटमध्ये )
धरण क्षमता पाणीसाठा सरासरी%
पालखेड ६५३, ४४८, ६८
करंजवण ५३७१ १७५१ ३२
वाघाड २३०२ १४२९ ६२
ओझरखेड २१३० ६४० २६
पुणेगाव ६२० १७८ २९
तिसगाव ४५५ ६० १६
210821\21nsk_6_21082021_13.jpg
२१ दिंडोरी मांजरपाडा