जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:48 AM2018-11-05T00:48:03+5:302018-11-05T00:48:21+5:30

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील शेतकºयांना रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने काहीसा दिलासा मिळाला. लेट खरीप आणि सध्या लावणी सुरू असलेल्या रांगड्या कांद्यासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असला तरी द्राक्ष उत्पादकांची मात्र चिंता वाढविणारा आहे.

 Heavy rains in the district | जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

Next

नाशिक : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील शेतकºयांना रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने काहीसा दिलासा मिळाला. लेट खरीप आणि सध्या लावणी सुरू असलेल्या रांगड्या कांद्यासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असला तरी द्राक्ष उत्पादकांची मात्र चिंता वाढविणारा आहे. रविवारी सायंकाळी अचानक झालेल्या पावसामुळे शेतात सोंगणी करून पडलेला आणि खळ्यावर असलेला मका काही प्रमाणात भिजला. काही ठिकाणी शेतात काढून ठेवलेला लाल कांदा, मका झाकण्यासाठी शेतकºयांची धावपळ उडाली. ऐन दिवाळीत पावसाने हजेरी लावल्याने व्यापारी वर्गाची मात्र चिंता वाढली आहे.
लोहोणेर
शहर परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकºयांची चांगलीच धावपळ उडाली. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास लोहोणेर व परिसरातील गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. सध्या लोहोणेर व परिसरात कांदा लागवडीसाठी शेतकºयांची लगबग सुरू आहे. कांदा रोप लागवडीसाठी तयार होत असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतित आहे. या पावसामुळे कांदा पिकाच्या रोपांचे नुकसान झाले आहे, तर काही शेतकरी मका काढणीत व्यस्त असल्याने त्यांचीही धावपळ उडाली. काहीकाळ विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला होता.
चांदवड
शहर व परिसरात सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी विजेच्या कडकडाटांसह सुमारे एक तास पाऊस सुरू होता. चांदवड शहरातील वीजपुरवठा बराच काळ खंडित झाला होता. अचानक आलेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चांदवड तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याने पावसाने काहीसा दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे पिकांचे नुकसान आहे. वादळ वारा, विजेच्या कडकडाटासह सुमारे एक तास पाऊस झाला.
वडनेरभैरव
वडनेरभैरव परिसरात जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकºयांची तारांबळ उडाली. सध्या द्राक्ष हंगाम सुरू आहे. कही द्राक्षबागा फुलोºयात आहे पावसामुळे कुज गळ होऊन शेतकºयांचे नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
खामखेडा
परिसरात रविवारी सायंकाळी अचनक विजेच्या कडकडाटांसह पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. सकाळपासून प्रचंड प्रमाणात उष्मा जाणवत होता. परंतु पावसाचे कोणतेही चिन्हे दिसत नव्हते. सध्या मका कापणी व काढणीचा हंगाम असल्याने अचानक पाऊस झाल्याने शेतात कापून ठेवलेला मका भिजू नये म्हणून शेतकºयांची धावपळ झाली. काढणीस आलेला लाल कांदा या पावसामुळे खराब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वणी
परिसरात रविवारी सायंकाळी सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटांसह झालेल्या पावसामुळे काहीवेळ वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे फटाके विक्र त्यांची तारांबळ उडाली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.
देवळा
तालुुक्यात भीषण दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी चिंतित असताना रविवारी सायंकाळी देवळा शहर व परिसरात झालेल्या पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा, मका भिजला आहे. सध्या पोळ कांदा काढणीचे काम सुरू आहे. कांदा काढल्यानंतर अनेक शेतकरी शेतातच कांद्याच्या पोळ घालतात. अचानक आलेल्या पावसामुळे हा कांदा झाकण्यासाठी शेतकºयांची चांगलीच धावपळ उडाली. शेतात काढलेली मक्याची कणसे व चारा अचानक आलेल्या पावसामुळे भिजला आहे.
मालेगाव
मालेगावसह परिसरात सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वच शहर जलमय होवून गेले. तालुक्यातील चिंचवे गा. येथील पांडूरंग केशव सावळे या शेतकºयाची म्हैस वीज पडून ठार झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.
सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप हातातून गेले असून कमी प्रमाणात रब्बी पेरणी झाली आहे. शहरातील रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचे तळे साचले.
सोनजांब परिसरात गारांसह वादळी पाऊस
खेडगाव : परिसरात गारांसह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने द्राक्षेसह धान्य पिकांचे व टमाट्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आधीच भाजीपाल्याला भाव नाही. त्यात बेमोसमी पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रविवारी सायंकाळी साडेपाच सुमारास वादळी वाºयासह पावसाला सुरुवात झाली. सलग दोन ते तीन तास पाऊस झाला. सुरुवातीला सोनजांब परिसरात चार ते पाच मिनिटे गारपीट झाल्याचे तेथील शेतकरी वर्गाने सांगितले. आता या पावसाचा परिणाम द्राक्षबागेवर दिसेल. मागच्या वर्षीच्या बेमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करूनही द्राक्ष उत्पादक शेतकºयांना काहीच मदत मिळालेली नाही. आता परत झालेले हे नुकसान त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. बाजारपेठेत अजूनही दीपावलीच्या खरेदीची फारशी धावपळ दिसून येत नसल्याने व्यापारी वर्ग भरलेला माल विकला जाईल की नाही या चिंतेत असताना अवकाळी पावसाने त्यांची चिंता वाढवली आहे. महसूल विभागाने पंचनामे करण्याचे आदेश द्यावे, आशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.

Web Title:  Heavy rains in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.