नाशिक जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:11 AM2021-07-23T04:11:24+5:302021-07-23T04:11:24+5:30

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. धुवाधार पावसाने नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा ...

Heavy rains hit Nashik district | नाशिक जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा

नाशिक जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा

Next

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. धुवाधार पावसाने नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, तर कसारा घाटात दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक पहाटेपर्यंत विस्कळीत झाली होती. दरम्यान, रेल्वे वाहतुकीलाही याचा फटका बसल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

इगतपुरी तालुक्यात विक्रमी पाऊस

इगतपुरी शहरासह तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे दारणा, वाकी, भाम या नद्यांना पूर आला आहे. इगतपुरी तालुक्यात २४ तासांत २४०, घोटी १३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे भावली धरणात ८६ टक्के जलसाठा, दारणा धरणात ७३ टक्के, मुकणे ३४.५५, टक्के, भाम धरणात ३३ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी घर, समाजमंदिर, शाळांची पडझड झाली.

त्र्यंबकेश्वरला दाणादाण, भूस्खलन

त्र्यंबकेश्वर परिसरातील गाव, वाडे-पाड्यांवर पावसाने दाणादाण उडवली. ठिकठिकाणी दरड कोसळणे, भूस्खलन होणे यासह नदी-नाले, ओहोळांना पूरस्थिती उद‌्भवली. श्रीघाट - सावरपाडा येथे दरड व भूस्खलन होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे नदी, नाले, ओढे, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले आहेत.

पेठ तालुक्याचा संपर्क तुटला

पेठ तालुक्याला पावसाने झोडपून काढले. घाट रस्त्यावर दरडी कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. करंजाळी ते हरसूल राज्य मार्गावर दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

मनमाडला रेल्वे वाहतूक विस्कळीत

अतिवृष्टीमुळे काही रेल्वेगाड्या रद्द, तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला. रद्द गाड्यांमध्ये पंचवटी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. मंगला एक्स्प्रेस मनमाड दौंडमार्गे धावत असून, अनेक गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. पावसामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या आठ ते दहा तास उशिराने धावत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मनमाड रेल्वेस्थानकावर मदत कक्ष स्थापन करण्यात आला.

मनमाडला रेल्वे वाहतूक विस्कळीत

अतिवृष्टीमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. काही रद्द, तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला. रद्द गाड्यांमध्ये पंचवटी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. मंगला एक्स्प्रेस मनमाड दौंडमार्गे धावत असून, अनेक गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. पावसामुळे लांबपल्ल्याच्या गाड्या आठ ते दहा तास उशिराने धावत आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मनमाड रेल्वेस्थानकावर मदत कक्ष स्थापन करण्यात आला.

कसारा घाटात दरड कोसळली

मुसळधार पावसामुळे कसारा घाटात चार दिवसांत दुसऱ्यांदा दरड कोसळून रेल्वे व महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कसाऱ्याहून नाशिककडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. महामार्गावरील जुना कसारा घाटातून दरड हटविण्याचे काम पहाटे ४ वाजता संपल्याने मुंबईहून नाशिकला जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. कोसळलेल्या दरडी व माती हटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे गोरखपूर-हावडा, पवन एक्स्प्रेस, राज्यराणी, पंचवटी, सेवाग्राम, जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. मुंबईहून येणाऱ्या गाड्या वसई, विरारमार्गे तर भुसावळहून मुंबईकडे येणाऱ्या गाड्या जळगाव - मनमाडमार्गे वळविण्यात आल्या.

चौकट

गंगापूर धरणात ५३ टक्के साठा

त्र्यंबकेश्वर आणि गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणातील साठा वाढला असून, गुरुवारी (दि.२२) सायंकाळपर्यंत गंगापूर धरणात ३००४ दलघफू म्हणजेच ५३.३५ टक्के पाणीसाठा झाला आहे. गंगापूर धरण समूहात मात्र सरासरी ४२ टक्के साठा आहे. कश्यपी धरणात २, गौतमी गोदावरी ३१ तर आळंदी ३९ टक्के इतक साठा झाला आहे.

Web Title: Heavy rains hit Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.