जोरदार पावसाचा नाशिक-मुंबई रेल्वे वाहतूकीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 08:41 PM2019-09-25T20:41:20+5:302019-09-25T20:44:30+5:30
नाशिकरोड रेल्वे स्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले होते. रात्री आठ वाजेनंतर रेल्वे मार्ग (डाऊन) हळुहळु पर्वपदावर येऊ लागला; मात्र रेल्वेमार्ग (अप लाइन) वरील वाहतूक ठप्प झाली होती.
नाशिक : शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे बुधवारी (दि.२५) दूपारनंतर मध्य रेल्वेची भुसावळ-नाशिक-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूकीवर परिणाम होण्यास सुरूवात झाली. सायंकाळनंतर मात्र रेल्वेसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याने प्रवाशांना रेल्वेस्थानकावर अडकून प्रतीक्षा करावी लागली. देवळाली कॅम्प, अस्वली या रेल्वेस्थानकावरील रूळ पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. बहुतांश रेल्वेगाड्या लासलगाव, चाळीसगाव, नाशिकरोड, देवळाली कॅम्प या स्थानकात थांबविण्यात आल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत ‘अप लाईन’वरील वाहतूक पुर्वपदावर येऊ शकली नाही.
शहरासह सिन्नर, इगतपुरी, कळवण, दिंडोरी या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वेमार्गांवर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. यामुळे नाशिक-मुंबई मार्गावरील ‘अप-डाऊन लाइन’ पुर्णपणे बंद झाली. गोदावरी, सेवाग्राम, तपोवन या रेल्वेगाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनल मुंबई येथून पुढे सोडण्यात आल्या; मात्र या गाड्यांनाही इगतपुरी रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. पंचवटी एक्सप्रेसदेखील नाशिकच्या दिशेने उशिरा धावली. तसेच कानपूर (एल.टी.टी) गाडी नाशिकरोड स्थानकात तर तपोवन एक्सप्रेस देवळाली, कामयानी एक्सप्रेस लासलगाव वाराणसी, हरिद्वार या दोन्ही गाड्या चाळीसगाव रेल्वे स्थानकात थांबविण्यात आल्या होत्या. नाशिक शहरातदेखील जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे नाशिकरोड रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांना पडणे मुश्कील झाले होते. परिणामी प्रवाशांना पावसाचा जोर कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागली. नाशिकरोड रेल्वे स्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले होते.
रात्री आठ वाजेनंतर रेल्वे मार्ग (डाऊन) हळुहळु पर्वपदावर येऊ लागला; मात्र रेल्वेमार्ग (अप लाइन) वरील वाहतूक ठप्प झाली होती. देवळाली कॅम्पपासून पुढे अस्वली रेल्वेस्थानकातील रूळ पुर्णपणे पाण्यात बुडाले होते. यामुळे मुंबईकडे जाणारी व नाशिककडे येणारी रेल्वे वाहतूकीला मोठा फटका बसला.
--
जोरदार पावसाने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
अचूक वेळेवर धावणारी रेल्वेची गती जोरदार पावसामुळे चांगलीच मंदावली. रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले. मुंबईहून नाशिककडे येणा-या सर्वच गाड्या उशीरा धावल्या. तसेच भुसावळपासून नाशिकमार्गे मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूकदेखील विस्कळीत झाल्याने रेल्वेगाड्यांच्या वेळा चुकल्या. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत स्थानकात पावसाच्या उघडीपीची प्रतीक्षा करावी लागली.