अंदरसूल परिसरात पावसाची जोरदार हजेरी

By admin | Published: August 4, 2016 12:31 AM2016-08-04T00:31:26+5:302016-08-04T00:34:19+5:30

शाळेच्या आवारासह वर्गात पाणी : अकरा खोल्यांच्या भिंतीला गेले तडे

Heavy rains in the interior area | अंदरसूल परिसरात पावसाची जोरदार हजेरी

अंदरसूल परिसरात पावसाची जोरदार हजेरी

Next

 अंदरसूल : परिसरात मंगळवारी रात्रीपासून पावसाची सुरू असलेली संततधार बुधवारीही दिवसभर सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. येथील मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालयाच्या दुरवस्था झालेल्या इमारतीमध्ये पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एका सत्रातच सुटी देण्यात आली. दरम्यान, विद्यालयाच्या मोडकळीस आलेल्या अकरा खोल्यांच्या भिंतीला तडे गेले असून, छताचे प्लॅस्टरदेखील वारंवार कोसळत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत असल्याने विद्यार्थी व शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अनेक वेळेस वर्गात अध्यापनाचे काम सुरू असतानादेखील छत कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. परंतु संस्था याबाबत उदासीन असल्याचे बोलले जात आहे. सदर विद्यालयाची इमारत मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालय बांधकाम समितीच्या मालकीची असून, विद्यालयास भाडेतत्त्वावर दिली गेली आहे. परंतु एक वर्षापूर्वी बांधकाम समितीने इमारत वापर करण्याजोगी राहिली नसून सदर इमारतीचा दुरुस्तीचा खर्च परवडत नसल्याने पत्र देऊन धोकादायक बनलेल्या इमारतीत विद्यार्थी बसवू नये, असे पत्र विद्यालयाला देऊन आपली जबाबदारी झटकली आहे.
तर दूसरीकडे संस्थाचालकही उदासीन आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, तोडगा काढणे कठीण बनले आहे. मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी याप्रश्नी संस्थाचालक व बांधकाम समितीने लक्ष घालून सर्वसामान्यांची मुले या विद्यालयात शिक्षण घेत असल्याने हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी कळकळीची मागणी पालक व ग्रामस्थ करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Heavy rains in the interior area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.