येवला परिसरात वादळी पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 10:42 PM2021-05-29T22:42:00+5:302021-05-29T23:57:31+5:30
येवला : शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर लौकी शिरस येथे वीज पडून एक बैल मृत्युमुखी पडला आहे.
येवला : शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर लौकी शिरस येथे वीज पडून एक बैल मृत्युमुखी पडला आहे.
शनिवारी, (दि. २९) सकाळपासूनच वातावरण बदललेले होते. वाढत्या उष्म्यात दुपारच्या सुमारास जोरदार सोसाट्याचा वारा सुटला. त्यापाठोपाठ विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरीही कोसळायला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसाने ग्रामीण भागात शेतकरी वर्गाची मोठी धावपळ झाली तर शहरातील अनेक ठिकाणी गटारे तुंबून पाणी रस्त्यावरून वाहत होते.
शहरासह केळम बुद्रुक, धामोडे, वडगाव बल्हे, अंदरसुल, निमगाव मढ, साताळी आदी ठिकाणी घरांची पडझड होऊन झाडेदेखील पडल्याने नुकसान झाले आहे. रेंडाळे, पारेगाव येथेही वादळी पावसाने नुकसान झाले आहे.
शहरातील विंचूर रोडवरील एका घराजवळ वीज कोसळली. घराचा कोपरा या विजेने कोसळला असला तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तर उमेश अट्टल, संतोष अट्टल या कांदा व्यापाऱ्यांच्या दोन शेड कोसळून शेकडो क्विंटल कांदा पावसाने भिजला. यामुळे अट्टल यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील लौकी शिरस येथे वीज पडून जगदीश जनार्दन कानडे यांचा बैल मृत्युमुखी पडला आहे. निमगाव मढ येथील बाबासाहेब आसाराम लभडे यांचा एक एकर कारल्याची बाग पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. साताळी येथील सखाहरी पांडुरंग निकम यांचे घर पडले तर मातुलठाण येथील शिवाजी विश्वनाथ नागरे यांचे घराचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. नगरसुल येथील वडाचा मळा येथील सीताराम गोविंद पैठणकर, किरण विष्णू पैठणकर यांच्या कांदा चाळीवर झाड कोसळल्याने कांदा चाळीसह साठवलेल्या कांद्याचे ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दत्तात्रय काशिनाथ पगारे यांच्या राहत्या घरावर सोलर सेट व झाड पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. राजापूर येथे वीज पडल्याने चारा जळाला आहे. कोळम बुद्रुक येथील भानुदास बाळकृष्ण कदम यांचे घरावरील पत्रे उडाले.
दरम्यान, नुकसानीची माहिती व पंचनामे करण्याचे काम महसूल यंत्रणेकडून सुरू आहे.
फोटो- २९ येवला रेन १ ते ५