मानोरी परिसरात मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:16 AM2021-07-14T04:16:57+5:302021-07-14T04:16:57+5:30
गेल्या तीन ते चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दमट वातावरण निर्माण झाले होते. तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाअभावी दुबार पेरणीचेदेखील ...
गेल्या तीन ते चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दमट वातावरण निर्माण झाले होते. तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाअभावी दुबार पेरणीचेदेखील संकट ओढवले होते. मात्र, सोमवारी मध्यरात्री अचानक विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट तूर्तास टळले आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरीवर्गाची एकच तारांबळ उडाली होती. अर्धा तास झालेल्या या अतिमुसळधार पावसामुळे शेतशिवारातील शेतात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहण्यास सुरुवात झाली होती. मानोरी गावालगत असलेला नालादेखील या अचानक आलेल्या पावसामुळे ओसंडून वाहू लागला. चंद्रभान तिपायले यांची शेती नाल्यालगत असल्याने नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने संपूर्ण मकापीक पाण्यात होते.
दरम्यान, यंदा मानोरी बुद्रुक, मुखेड, खडकीमाळ, नेउरगाव, चिचोंडी परिसरात मागील आठ दिवसांपूर्वी खरीप हंगामातील पिकांची लागवड झाली आहे.
तालुक्यातील बहुतांश भागात खरीप हंगामातील पिकांच्या कोळपणीचे काम मोठ्या जोमाने सुरू आहे. मानोरी परिसरात मात्र आठ दिवसांपूर्वी खरीप हंगामातील पिकांची पेरणी झाली असून, अद्याप काही ठिकाणी बियाणे शेतातून डोकावण्यास सुरुवात झाली असून, असाच मुसळधार पाऊस पुढील काही दिवसांत पडल्यास खरीप हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पावसामुळे साडेबारा वाजण्याच्या दरम्यान मानोरीतील वीजपुरवठा खंडित झाला होता. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला होता.
फोटो : १२ मानोरी रेन
मानोरी बु. येथील शेतात घुसलेले नाल्याचे पाणी शेतातून बाहेर काढताना विठ्ठल तिपायले.
120721\12nsk_21_12072021_13.jpg
फोटो : १२ मानोरी रेन मानोरी बु.येथील शेतात घुसलेले नाल्याचे पाणी शेतातून बाहेर काढताना विठ्ठल तिपायले.