परतीचा बेफाम पाऊस, रस्त्यातील खड्डे आणि प्रशासनाला लागले फटाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 11:22 PM2022-10-22T23:22:21+5:302022-10-22T23:59:34+5:30
यंदाचा पावसाळा वेगळाच आहे. प्रत्येक महिन्यात दमदार पाऊस कोसळला. वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस सर्वच तालुक्यांमध्ये झाला आहे. ढगफुटीसदृश, अतिवृष्टी, मुसळधार अशा प्रकारचा पाऊस अनेक ठिकाणी झाला. राज्य सरकारने तिजोरी खुली केली असल्याने अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात दिला जात आहे. पण पाऊस एवढा आहे की, खरीप हंगाम पाण्यात गेला. हाताशी आलेली पिके सडली आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मनसे नेते राज ठाकरे यांनी केली आहे. मदत देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या दौऱ्यात केली. अतिवृष्टीमुळे रस्ते, महामार्गांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. यंत्रणा खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेते आणि लगेच पाऊस कोसळतो, अशी स्थिती झाल्याने प्रशासन हतबल झाले आहे. पाऊस थांबत नाही आणि दुरुस्ती करता येत नाही, अशी गत प्रशासनाची झाली आहे. खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या जनतेने आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्याचे फटके मालेगावात तसेच नाशिक-मुंबई रस्त्याची देखभाल करणाऱ्या न्हाईला बसले.
मिलिंद कुलकर्णी

टोलनाका बंद होणार?
नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांचा विषय १० ऑक्टोबरला झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गाजला. महामार्गावर खड्डे पडल्यास ७२ तासांत देखभाल व दुरुस्तीचे काम असणाऱ्या टोल कंपनीच्या यंत्रणेने बुजविण्याची तरतूद असल्याची आठवण पालकमंत्री दादा भुसे यांनी करुन दिली. १५ दिवसांत महामार्गावरील खड्डे न बुजविल्यास टोलनाके बंद करण्याचा अल्टिमेटम पालकमंत्र्यांनी दिला आहे. दोन दिवसांनी अल्टिमेटमची मुदत संपणार आहे. मात्र खड्डे काही बुजवले गेले नाही, हे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या पाहणी दौऱ्यात आढळून आले. त्यांनीही अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यांनीही ३१ ऑक्टोबरचा अल्टिमेटम दिला आहे. खड्डे न बुजविल्यास टोलनाके बंद करण्याचा इशारा दिला आहे. आजी आणि माजी पालकमंत्री यांनी टोकनाक्यांविषयी एक सूर लावल्याने खरोखर नाके बंद होतात की खड्डे बुजविले जातात, याची उत्सुकता सर्वसामान्यांना आहे.
मालेगावातील नुरा कुस्ती
मालेगावात आमदार मौलाना मुफ्ती व माजी आमदार रशीद शेख यांच्यात संघर्ष सुरू आहे. आगामी महापालिका निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून या दोघांच्या संघर्षाकडे पाहता येईल. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर असतानाही रशीद शेख व तत्कालीन महापौर ताहेरा शेख यांनी कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हातावर बांधले. मात्र सत्ता परिवर्तन घडले आणि समीकरण बदलले. आमदार मुफ्ती यांनी मंत्री दादा भुसे यांच्याशी जुळवून घेतले. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी थेट शिवसेनेच्या व्यासपीठावर गेले. विकासकामांसाठी सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेण्यात गैर काय, असा टीकाकारांना प्रतिसवाल त्यांनी केला. रशीद शेख यांच्या राजकीय कारकिर्दीला ४० वर्षे पूर्ण झाली म्हणून नागरी सत्काराला अजित पवार व जयंत पाटील आले. त्यापाठोपाठ आमदारांनी महापालिकेच्या प्रश्नांवरून रास्ता रोको आंदोलन केले. महापालिका आयुक्तांवर गटारीचे पाणी फेकण्याचा प्रकार घडला. जनतेच्या हितासाठी ही लढाई आहे की, स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी नुरा कुस्ती चालली आहे, हे यथावकाश लक्षात येईल.
ग्रामपंचायतीतही घराणेशाही
घराणेशाहीचा मुद्दा पंतप्रधानांनी उपस्थित केल्यापासून त्याची चर्चा गल्ली ते दिल्ली होत आहे. चर्चा होत असली तरी हा अपरिहार्य विषय असल्याच्या मानसिकतेत राजकीय नेते व पक्ष असल्याचे चित्र नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आले. सत्ता कोणत्याही स्थितीत आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या ताब्यात रहावी, यासाठी नेते प्रयत्नशील राहिले. वर्षानुवर्षे गड राखला जातो, याचा अर्थ परिस्थितीनुरूप हे नेते भाकरी फिरवत आहेत, असाच काढला जातो. पेठ तालुक्याचे उदाहरण घेऊया. भास्कर गावीत यांचे पुत्र श्याम हे राजबारी, दामू राऊत यांचे पुत्र दिलीप हे माळेगाव, विशाल जाधव यांच्या पत्नी गीता या आसरबारी या गावातून निवडून आल्या. शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे मातब्बर नेत्यांची ही स्थिती आहे. इगतपुरीत रतनकुमार इचम, ज्ञानेश्वर लोंढे, पांडुरंग खताळे, तर सुरगाण्यात जे. पी. गावित व आमदार नितीन पवार यांनी आपापले गड राखले.
युवराजांची राजकीय भूमिका
राज्यसभेची संधी हुकल्यानंतर राजकीय पक्षांपासून फटकून वागणाऱ्या युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आता जुळवून घेण्याचे ठरविलेले दिसतेय. या आठवड्यात कोल्हापुरात हसन मुश्रीफ या राष्ट्रवादी नेत्यासोबत व्यासपीठावर दिसलेले युवराज दोन दिवसांनी नाशकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपस्थित होते. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आणि रोजगार व प्रशिक्षणाचा विषय मार्गी लावायचा असेल तर सत्ताधारी आणि विरोधक या दोघांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे युवराजांनी हे पाऊल उचलले असावे. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य सुरू केले आहे. राज्यभर फिरून संवाद व संपर्क अभियान राबविले आहे. त्यांच्या यापूर्वीच्या राज्यव्यापी दौऱ्याने मराठा समाजात आरक्षणाप्रती जनजागृती केली. त्यातून मोठे आंदोलन उभे राहिले.