मुसळधार पावसाने शहराला झोडपले
By admin | Published: January 24, 2015 11:52 PM2015-01-24T23:52:36+5:302015-01-24T23:53:53+5:30
मुसळधार पावसाने शहराला झोडपले
नाशिक : गुरुवारपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे अखेर अपेक्षेप्रमाणे शनिवारी मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढले.
दिवसभर ऊनसावल्यांचा खेळ सुरू असताना सायंकाळच्या सुमारास दाटून आलेल्या काळ्या ढगांनी एकदमच कोसळायला सुरुवात केली. काही आठवड्यांपासून नाशिक हे राज्यातील थंडीचे शहर ठरते आहे. शहरात ६ अंश तपमान असताना ग्रामीण भागातील पारा यापेक्षा घसरला होता. बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि उत्तरेतून येणारे गार वारे यामुळे नाशिकमध्ये थंडीची तीव्रता वाढली होती. त्यातच आर्द्रताही घटल्याने पावसानेही हजेरी लावून थंडीत वाढ केली.
अशातच जानेवारीच्या मध्यानंतर शहरातील तपमान पुन्हा वाढीस लागले होते. १४ पर्यंत तपमान गेल्यानंतर पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरणाचे सावट होते. गुरुवारपासूनच शहरावर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. शनिवारी सायंकाळी ७च्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली.
पादचारी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांचे त्यामुळे मोठे हाल झाले. परंतु त्यामुळे शहरातील तपमानाचा पारा पुन्हा घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, असे झाल्यास पुन्हा शेकोट्या पेटू लागतील. अजून काही दिवस मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरणाचे कायम राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)