लोकवस्तीतून अवजड वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 11:58 PM2020-02-09T23:58:01+5:302020-02-10T00:55:50+5:30
द्वारका चौकातून अवजड वाहनांची वाहतूक बंद करून अन्यत्र मार्गाने वळविण्यात आल्याने पुणे महामार्गाकडून येणारी अवजड वाहने वडाळा-पाथर्डी रस्त्याने मार्गक्रमण करू लागली आहेत. त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. लोकवस्तीतून होणारी अवजड वाहनांची वाहतूक तातडीने बंद करावी अन्यथा ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.
इंदिरानगर : द्वारका चौकातून अवजड वाहनांची वाहतूक बंद करून अन्यत्र मार्गाने वळविण्यात आल्याने पुणे महामार्गाकडून येणारी अवजड वाहने वडाळा-पाथर्डी रस्त्याने मार्गक्रमण करू लागली आहेत. त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. लोकवस्तीतून होणारी अवजड वाहनांची वाहतूक तातडीने बंद करावी अन्यथा ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.
महापालिकेने लाखो रु पये खर्च करून वडाळानाका ते पाथर्डीगाव दरम्यान नागपूरच्या धर्तीवर दोन टप्प्यात रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्यात आले. या रस्त्यावर विनयनगर, इंदिरानगर, साईनाथनगर, सार्थकनगर, कलानगर, पांडवनगरी, शरयूनगर, समर्थनगर यांसह विविध उपनगरे आहेत. त्यामुळे अंबड औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. तसेच या रस्त्यालगतच प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालय असल्याने दिवसभर शेकडोच्या संख्येने विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू असते. परिसरात सुमारे ६० टक्के ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. चालणे हा शरीरासाठी उत्तम व्यायाम असल्याने सकाळी व सायंकाळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक वडाळा-पाथर्डी रस्त्यावर फेरफटका मारण्यासाठी निघतात. परंतु अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघाताच्या शक्यतेने ज्येष्ठ नागरिकांची धडकी भरत आहे.
वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा जयवंत मोरे, दत्तात्रय पोटिंदे, सदाशिव उगले, रमेश नागरे, बाबूराव पाटील, वाल्मीक हिरे, पंडित बडगुजर, दिलीप चव्हाण, सुभाष बेंडाळे, वसंतराव शिंदे, वसंत वझरे, परशुराम निकम यांसह ज्येष्ठ नागरिकांनी दिला आहे.
रस्त्यावरून मार्गक्रमण करणे अवघड
वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यासाठी परिसरातून विरोध होत आहे. त्याची दखल घेऊन पोलीस आयुक्तांना सर्व नगरसेवक आणि नागरिक भेटून निवेदनाद्वारे तातडीने अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी करण्यात आली. या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता लोकवस्तीतून गेल्या सहा दिवसांपासून द्वारका चौकातून निर्बंध घालण्यात आलेले मालट्रक, ट्रेलर, कंटेनर, टॅँकरची वाहतूक या रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, पादचारी व वाहनधारकांना रस्त्यावरून मार्गक्र मण करणे जिकिरीचे झाले आहे.