मद्यधुंद चालकांचा वाढता त्रास, संतप्त वावीकरांनी अडवली समृध्दी महामार्गाची अवजड वाहने
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 03:21 PM2021-06-06T15:21:04+5:302021-06-06T15:22:12+5:30
Nashik News: डंपर व अन्य अवजड वाहने अडवून सुमारे दोन तास झाल्यानंतरही समृध्दी महामार्गाच्या ठेकेदारासह कोणीही अधिकारी घटनास्थळी न फिरकल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नाशिक - समृध्दी महामार्गाच्या कामावर असलेल्या अवजड वाहनांनी पूर्व भागातील रस्त्यांची पुरती वाट लावली असून मद्यधुंद चालकांच्या त्रासामुळे शेतकरी व ग्रामस्थांना त्रास होत असल्याच्या निषेषार्ध संतप्त झालेल्या वावी ग्रामपंचायत पदाधिका-यांसह ग्रामस्थांनी समृध्दी महामार्गाच्या अवजड वाहनांना दोन तासांपासून अडवून धरले आहे.
डंपर व अन्य अवजड वाहने अडवून सुमारे दोन तास झाल्यानंतरही समृध्दी महामार्गाच्या ठेकेदारासह कोणीही अधिकारी घटनास्थळी न फिरकल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वावी येथील फुलेनगर, घोटेवाडी व कहांडळवाडी या चौफुलीवर अनेक अवजड वाहने ग्रामपंचायत पदाधिकाºयासह नागरिकांनी रोखून धरली आहे. सरपंच कन्हैयालाल भुतडा, माजी सरपंच विजय काटे, सदस्य प्रशांत कर्पे, विनायक घेगडमल, विजय सोमाणी, सचिन वेलजाळी, विलास पठाडे, संतोष जोशी, दशरथ आहेर, ज्ञानेश्वर खाटेकर, राकेश आनप, गणेश वेलजाळी, किशोर मालपाणी, सुनील जाधव, नितीन आनप यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
जेसीबी अंगावर घातल्याने संताप
शनिवारी रात्री समृध्दी महामार्गावर ठेकेदाराकडे कामाला असलेल्या जेसीबी चालकाने मद्यधुंद होऊन गावातून जेसीबी चालविला. दशरथ आहेर यांच्या दुकानाला या जेसीबीचा धक्का लागला. त्याचबरोबर नितीन शिवदे व पत्रकार संतोष भोपी यांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संतोष भोपी यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या घटनेमुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.