उत्पन्नासह वारस दाखले यापुढे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:17 AM2017-09-29T00:17:15+5:302017-09-29T00:17:15+5:30
राज्यातील तलाठी व मंडळ अधिकाºयांना अधिकार नसलेले रहिवासी, उत्पन्नाच्या दाखल्यांसह विविध प्रकारचे बारा ते तेरा दाखले येत्या दोन आॅक्टोबरपासून देणे बंद करण्याचा निर्णय तलाठ्यांनी घेतला आहे.
नाशिक : राज्यातील तलाठी व मंडळ अधिकाºयांना अधिकार नसलेले रहिवासी, उत्पन्नाच्या दाखल्यांसह विविध प्रकारचे बारा ते तेरा दाखले येत्या दोन आॅक्टोबरपासून देणे बंद करण्याचा निर्णय तलाठ्यांनी घेतला आहे.
यासंदर्भात राज्य तलाठी महासंघाची परभणी येथे नुकतीच बैठक घेण्यात आली असता त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतचे निवेदन महसूल विभागाचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांना देण्यात आले आहे. शासकीय कामात अडथळे येऊ नये, लोकांची कामे दाखल्याविना थांबू नये या हेतूने गावोगावचे तलाठी व मंडळ अधिकारी लोकांच्या आणि विविध विभागांच्या मागणीनुसार दाखले देतात.
त्यातून लोकांच्या गरजा भागत होत्या मात्र तलाठी व मंडळ अधिकाºयांना अधिकार नसतानाही दाखले दिल्याने तलाठी व मंडळ अधिकाºयांना काही प्रकरणात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांना यासंदर्भात न्यायालयाकडूनही विचारणा झाल्यामुळे संबंधिताना मनस्ताप होऊ लागला आहे. राज्य तलाठी संघाच्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली व त्यावर जे दाखले देण्याचा अधिकारच नाही ते दाखले देण्याचे बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तलाठी महासंघाने महसूल विभागाच्या सचिवांना निवेदन देऊन त्याबाबत मार्गदर्शनही मागविले आहे.