नेते-नगरसेवकांचे वारसही निवडणूक लढवण्याच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:17 AM2021-09-22T04:17:12+5:302021-09-22T04:17:12+5:30
नाशिक : महापालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून इच्छुकांची जेारदार तयारी सुरू झाली आहे. महापालिकेची ही सातवी पंचवार्षिक निवडणूक ...
नाशिक : महापालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून इच्छुकांची जेारदार तयारी सुरू झाली आहे. महापालिकेची ही सातवी पंचवार्षिक निवडणूक असल्याने अनेकवेळा निवडणूक लढवणाऱ्यांनी आता आपल्या वारसांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. विशेषत: केारेाना काळातील सामाजिक उपक्रम किंवा अन्य सामाजिक उपक्रमातून अनेकांनी आपल्या मुला-मुलींना लाँच केले असून, आता बऱ्यापैकी निवडणूक लढवण्याची सज्जता केली आहे.
नाशिक महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट १९९२ पासून सुरू झाली. त्यात सध्याची सहावी पंचवार्षिक निवडणूक आहे. २०२२ मध्ये सातवी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. गेली अनेक वर्षे नगरसेवक असलेल्या अनेक नगरसेवकांना निवृत्तीचे वेध लागले आहेत. तर काहींना आता आताच राजकारणात मुलाने सुरुवात केली तर वारस तयार होईल असेही वाटते आहे. राजकारण सन्यास घेतला नसला तरी आपल्या उपस्थितीतच वारस राजकारणात काही तरी पदावर जावा यासाठीही अनेक राजकीय नेत्यांची धडपड असते तर काहींना राजकीय सन्यासच आता घ्यावा वाटू लागला आहे. वयोमानामुळे आता किती काळ आणखी नगरसेवक राहायचा असाही विचार अनेक नगरसेवक करीत आहेत.
अर्थात, महापालिकेत असे अनेक वारस यापूर्वीच दाखल झाले आहेत. माजी महापौर वसंत गिते यांचे पुत्र प्रथमेश गिते यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. नगरपालिका काळापासून नगरसेवक असलेले ज्येष्ठ काँग्रेस नगरसेवक उत्तमराव कांबळे यांनी २०१७ मध्ये थांबून समीर कांबळे यांना नगरसेवक म्हणून निवडून आणले आहे. स्थायी समितीचेच माजी सभापती डॉ. बाळासाहेब आहेर यांच्या कन्या हिमगौर आडकेदेखील विद्यमान नगरसेवक आहेत. भाजपचेच विजय साने यांचे पुत्र ॲड. अजिंक्य साने तसेच माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानपदेखील विद्यमान नगरसेवक आहेत.
नाशिक शहरात सध्या ज्येष्ठ नगरसेवकांच्या मुलांची नावे चर्चेत आहेत. माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम यांची चर्चा असून, गेल्या वेळी दिनकर पाटील यांचे चिंरजीव अमोल यांचा आनंदवल्ली परिसरात पराभव झाला होता, मात्र तेही आता तयारीत आहेत. याच भागातून निवडणूक लढवू न शकलेल्या रश्मी बेंडाळे या आमदार सीमा हिरे यांची कन्या आहेत. विद्यमान महापौर सतीश कुलकर्णी यांची कन्या संध्या कुलकर्णी यादेखील यंदा नशीब अजमावणार आहेत, तर सध्या शिवसेनेत असलेले सुनील बागुल यांचे पुत्र आणि विद्यमान उपमहापौर भिकूबाई बागुल यांचे नातू मनीष बागुल भाजयुमाचे अध्यक्ष असून, तेही निवडणूक लढवणार आहेत. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि त्यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यादेखील नगरसेवक आहेत, त्यांचा मुलगा दीपक बडगुजरदेखील तयारीत आहेत. माजी महापौर विनायक पांडे यांचे पुत्र प्रेम, दिवंगत नगरसेविका कल्पना पांडे यांची कन्या शिवानी, नाशिकराेड येथील दिवंगत ज्येष्ठ नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे पुत्र योगेश गाडेकर, पंचवटीतच स्थायी समितीचे माजी सभापती उध्दव निमसे यांचे पुत्र रिद्धीश निमसे, शिवाजी गांगुर्डे यांचे चिरंजीव रवींद्र असे अनेक जण आता निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
सर्वाधिक मोठी यादी सिडकोत असून, यात अजिंक्य चुंभळे, राम अण्णा पाटील, सुशील रत्नाकर बडदे, शिवम मामा ठाकरे, अमोल नाना महाले, दिनेश कैलास आहिरे, शरद रामदास दातीर, भूषण राणे यांचा समावेश आहे. सातपूर विभागात पाटील बंधूंच्या वारसाबरोबरच लोकेश अशोक गवळी यांचे नावही चर्चेत आहेत, पूर्व विभागात सतीश सोनवणे यांचे चिरंजीव अनिकेत सेानवणेदेखील तयारीत आहेत.
आर फेाटोवर....
संध्या कुलकर्णी, रश्मी बेंडाळे, दीपक बडगुजर, योगेश गाडेकर, मनीष बागुल.