आर्थिक अडचणीतील क्लासचालकांना मदत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:15 AM2021-04-20T04:15:39+5:302021-04-20T04:15:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : गेल्या तेरा ते चौदा महिन्यांपासून सर्वप्रकारचे क्लासेस बंद असल्याने व यापुढेही नजीकच्या काळात क्लास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या तेरा ते चौदा महिन्यांपासून सर्वप्रकारचे क्लासेस बंद असल्याने व यापुढेही नजीकच्या काळात क्लास सुरू होण्याची शक्यता नसल्याने, जिल्ह्यातील व पर्यायाने महाराष्ट्रातील छोटे व घरगुती क्लासेस संचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. क्लास बंद असल्याने त्यांचा उदरनिर्वाहही आता कठीण झाला आहे. त्यामुळे अशा छोट्या व घरगुती क्लासेस संचालकांना सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करणारे कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने मुख्यमंत्र्यांना सोमवारी (दि. १९) लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे. तसेच लोकप्रतिनिधींनीही क्लासचालकांच्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहनही संघटनेने केले आहे.
शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांना नियमित वेतन चालू आहे, त्याचप्रमाणे मोठे व मध्यम क्लासेसचालकही थोड्या बचतीवर तग धरून आहेत. परंतु छोटे व घरगुती क्लासेस संचालकांचा मात्र कणा पुरता मोडला आहे. अनेक क्लासचालकांनी जागा सोडल्या आहेत, काहींचे भाडे थकले आहे, कर्जाचे हप्ते थकले आहेत, घरखर्चालाही आता उसनवार करण्याची वेळ आली आहे. त्यातच आजारपण, मुलांच्या संगोपनाची जबाबदारी, घरपट्टी, वीजबिल आदी खर्चांमुळे हे लोक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. मागील महिन्यात, नाशिकमध्ये एका क्लासचालकाने आत्महत्या केली असून, एकाचे तणावामुळे हृदयविकाराने निधन झाल्याचेही संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी नमूद केले आहे.
अनेक क्लासचालक भाजीपाला विकणे व अन्य छोटे व्यवसायही करून पाहत आहेत. परंतु त्यात लॉकडाऊनमुळे पाहिजे तसे उत्पन्न मिळत नाही. ऑनलाइन क्लासेस अपयशी ठरत आल्याने या कठीण परिस्थितीत शासनाने अशा क्लासेस संचालकांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य खासगी कोचिंग क्लासेस संचालक संघटना व जिल्हा संघटनेतर्फे करण्यात आली आहे. या पत्रावर खजिनदार अतुल आचलिया, सरचिटणीस लोकेश पारख, विभागप्रमुख पवन जोशी, महिलाप्रमुख पूनम कांडेकर यांसह उपाध्यक्ष अण्णासाहेब नरुटे, अरुण कुशारे, अशोक देशपांडे, मुकुंद रनाळकर आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.