सोशल मिडियाच्या माध्यमातून मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 03:54 PM2018-10-03T15:54:11+5:302018-10-03T15:54:22+5:30
दातृत्व : पांढरीपाडा शाळेला मिळाली पाण्याची टाकी
कळवण : विद्यार्थ्यांच्या पोटाची व ज्ञानाची भूक भागवण्याबरोबरच त्यांची पिण्याच्या पाण्याची तहानही भागवायला हवी या उद्देशाने तालुक्यातील दुर्गम भागातील पांढरीपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दानशूर व्यक्तींच्या मदतीतून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. कळवण येथील व्यावसायिक तुषार मालपुरे यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाण्याची टाकी भेट दिली. यामुळे शुद्ध व स्वच्छ पाणी शाळेला उपलब्ध झाले आहे.
आदिवासी वस्ती व दुर्गम भागात असलेली पांढरीपाडा शाळा तशी दुर्लक्षितच होती. शाळेचे अंतरंग व बाह्यांग बदलत असतांना शाळेसाठी सार्वजनिक नळ पाणी पुरवठा केला जात होता परंतु पाणी साठवण्यासाठी सोय नव्हती. आर्थिक तरतूद नसल्याने सर्व पर्याय खुंटले होते. परंतु एक अपेक्षा म्हणून मुख्याध्यापक भास्कर भामरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक सुविधांसाठी विविध गृपवर आर्थिक मदतीचे आवाहन केले असता येथील युवा व्यावसायिक तुषार मालपुरे यांनी प्रतिसाद देत शाळेसाठी ही मदत केली. यापूर्वीही काही दानशूर व्यक्तींनी या शाळेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यातून आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय व भौतिक साहित्य घेतले जात आहे. एकीकडे सोशल मिडियाच्या गैरवापरामुळे तरु णपिढी भरकटत असल्याचे चित्र असतांना शिक्षकांनी आवश्यक मदतनिधीसाठी सोशल मिडियाचा आधार घेवून त्याच्या सदुपयोगाचेही दर्शन घडविले आहे.
शैक्षणिक पर्यटन स्थळ करण्याचा मानस
सोशल मिडियाच्या माध्यमातून ख-या गरजूंना मदत मिळवून दिल्याने आनंद झाला. शाळेसाठी अद्याप ब-याच सुविधांची वानवा असून भविष्यात पांढरीपाडा शाळा एक शैक्षणिक पर्यटन स्थळ करण्याचा मानस आहे.
-भास्कर भामरे, मुख्याध्यापक, पांढरीपाडा