लष्करी अळीच्या हल्ल्याने शेतकरी हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 04:32 PM2019-07-19T16:32:44+5:302019-07-19T16:33:01+5:30
कळवण तालुका : वडाळेवणीत जागृती मेळावा
कळवण - कळवण तालुक्यात अमेरिकन लष्करी अळीने मका पिकावर हल्ला चढविल्याने शेतकरी बांधव हतबल झाले आहेत. कृषी विभागाने नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले असून कृषी सहाय्यक संगीता राऊत ,मंडळ कृषी अधिकारी सीताराम पाखरे तसेच तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी मौजे-वडाळे वणी गावात जाऊन शेतकरी मेळावा तसेच प्रत्यक्ष शेतात जाऊन लष्करी अळी बाबत जागृती केली.
तालुक्यात अजून पूर्णपणे पेरणी झालेली नाही. आतापर्यंत अंदाजे १६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात ज्या भागात पाऊस झाला त्या भागात मका पिकाच्या पेरण्या झालेल्या आहेत . मात्र उगवणी नंतर झाड वाढीस लागताच पानावर लष्करी अळी हल्ला करीत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे .तालुक्यात पहिल्यांदाच या अळीने आक्रमण केले आहे . या अळीची अंडी कोष पतंग या चार अवस्थेत वाढ होते. हि अळी हजार ते दीडहजार अंडी देते. पिकाच्या कोवळ्या फांद्यांवर हल्ला चढवते . त्यामुळे पानावर पांढरे चट्टे पडतात . अळी मोठी आल्यानंतर पिकाचे पाने खाऊन त्यावर विष्ठा करतात. त्यामुळे वाढीपूर्वी मक्याच्या फांद्यांचे प्रचंड नुकसान होते. मका पिकाची उगवण होताच बळीराजा हजारो रु पये खर्च करून कीटक नाशकांच्या फवारण्या करत आहेत. परंतु काही प्रमाणात अळीच्या नियंत्रणासाठी यश आले असले तरी अनेक जण मात्र हतबल झाले आहेत. यामुळे कृषी विभागाने तालुक्यात गावागावात जाऊन पिकाची पाहणी सुरु केली आहे. विविध गावात अळी नियंत्रणात आणण्यासाठी मेळावे घेतले जात आहेत .
..अशी करा उपाययोजना!
कीड ग्रस्त पिकाच्या शेतातील खोल नांगरणी करावी म्हणजे पक्षांद्वारे किडीच्या वेगवेगळ्या अवस्था नष्ट करण्यास मदत होते. शेतात एकरी ४ पक्षी थांबे उभारावेत जेणे करून पानावरील अळी टिपून खाते. पिकावरील नियमित सर्वेक्षण करावे. या किडींचे पतंगांना आकर्षित करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. पिकावरील अंडी समूह अळ्या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात. १५०० पी.पी.एम. किव्हा निंबोळी अर्क ५ टक्के ५० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फराव्यात. मका अमेरिकन लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.