खासगी वाहतूकदारांची महामंडळाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:52 PM2017-10-17T23:52:53+5:302017-10-18T00:12:07+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपामुळे नागरिकांचे हाल होऊ नये व काही प्रमाणात गैरसोय कमी व्हावी, या उद्देशाने प्रादेशिक परिवहन विभाग व एसटी महामंडळाने शासनाच्या आदेशानुसार खासगी वाहतूकदारांची मदत घेण्याचा निर्णय मंगळवारी (दि. १७) दुपारी घेतला. यानुसार शहरातील चौधरी यात्रा कंपनीच्या खासगी ५० बसेसद्वारे ‘आपत्कालीन सेवा’ पुरविण्यात आली.

 Help of the private transport managers | खासगी वाहतूकदारांची महामंडळाला मदत

खासगी वाहतूकदारांची महामंडळाला मदत

Next

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपामुळे नागरिकांचे हाल होऊ नये व काही प्रमाणात गैरसोय कमी व्हावी, या उद्देशाने प्रादेशिक परिवहन विभाग व एसटी महामंडळाने शासनाच्या आदेशानुसार खासगी वाहतूकदारांची मदत घेण्याचा निर्णय मंगळवारी (दि. १७) दुपारी घेतला. यानुसार शहरातील चौधरी यात्रा कंपनीच्या खासगी ५० बसेसद्वारे ‘आपत्कालीन सेवा’ पुरविण्यात आली. एसटीच्या दरापेक्षाही निम्म्या दरात प्रवासी वाहतूक जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर सुरू केल्याची माहिती कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी दिली.
दिवाळीच्या कालावधीत एसटी कर्मचारी राज्यव्यापी संपावर गेल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे महामंडळाच्या कारभारासह सरकारच्या भूमिकेविरुद्धही तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांची गैरसोय काही प्रमाणात कमी होण्यासाठी खासगी वाहतूकदारांची मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने पुढाकार घेतला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी चौधरी यांच्याशी संपर्क साधून प्रवासी वाहतूक करण्यास सांगितले. दरम्यान, चौधरी यांनी एसटीच्या दरपत्रकापेक्षा निम्म्या दरात नागरिकांना सणासुदीच्या काळात वाहतूक सेवा पुरविण्याची तयारी दर्शवित ठक्कर बाजार येथून बससेवा दुपारी सुरू केली. पुणे, औरंगाबाद, धुळे, सटाणा, नंदुरबार, जळगाव आदी शहरांसाठी ठक्कर बाजार येथून खासगी बससेवा उपलब्ध आहे. मंगळवारी त्र्यंबकेश्वरसाठी पाच बसेसद्वारे मोफत सेवा देण्यात आली.
खासगी वाहतुकीबाबत शासनाची अधिसूचना
गृहमंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेनुसार सणासुदीच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवासी वाहतुकीसाठी मोटार वाहन अधिनियमानुसार शासनाने राज्यातील सर्व खासगी संस्थांच्या मालकीच्या बसेसला प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये खासगी ट्रॅव्हल्स, स्कूल-कॉलेजच्या बसेस, विविध कंपन्यांच्या बसेस व मालवाहू वाहनांनाही प्रवासी वाहतूक करता येणार असल्याचे अधिसूचनेत शासनाच्या कार्यासन अधिकारी नि. ज्यो. घिरटकर यांनी म्हटले आहे.
संप नागरिकांसाठी अडचणींचा असतो. सनदशीर मार्गाने संप करणे हा कामगारांचा हक्क आहे; मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी दराच्या निम्म्यापेक्षाही कमी दरात आमची कंपनी प्रवाशांना सेवा देण्यासाठी पुढे आली. यामागे नफेखोरीचा उद्देश नसून केवळ माणुसकी म्हणून आम्ही बससेवा उपलब्ध करून दिली आहे. संपकाळात बससेवा पुरविली जाणार असून, रात्रीदेखील बसेस ठक्कर बाजार येथून उपलब्ध असणार आहेत. कसारापर्यंत ५० रुपये प्रतिप्रवासीनुसार बससेवा असून, त्र्यंबकेश्वर, दिंडोरीसाठी मोफत सेवा पुरविली जाईल.
- ब्रिजमोहन चौधरी, संचालक

Web Title:  Help of the private transport managers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.