सहाणे यांच्या विजयामुळे सेनेला हुरूप
By admin | Published: January 14, 2015 01:11 AM2015-01-14T01:11:13+5:302015-01-14T01:11:51+5:30
सहाणे यांच्या विजयामुळे सेनेला हुरूप
नाशिक : विधान परिषद निवडणुकीत अखेर न्यायालयीन लढाईत अॅड. शिवाजी सहाणे यांनी बाजी मारली त्यामुळे शिवसेनेला हुरूप आला. मध्यवर्ती कार्यालयात सहाणे यांचा सत्कार करण्यात आला आणि त्याचबरोबर हा विजय अपेक्षित होता, असे मत व्यक्त करण्यात आले. त्याचवेळी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अॅड. शिवाजी सहाणे यांना पराभूत घोषित करून राष्ट्रवादीचे जयंत जाधव यांना विजयी घोषित करण्यात आले होते. त्यााविरुद्ध उच्च न्यायालयात सहाणे यांनी लढाई केली आणि विजयी झाले. मुंबईत शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर नाशिकमध्ये परतल्यानंतर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातही त्यांचा सत्कार माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार योगेश घोलप, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, महापालिकेतील विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष शामला दीक्षित आदि उपस्थित होते.