३२ वारसांना तीन लाखांची मदत
By admin | Published: December 23, 2015 11:31 PM2015-12-23T23:31:06+5:302015-12-23T23:33:38+5:30
३२ वारसांना तीन लाखांची मदत
नाशिकरोड : भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील प्रो-राटा पेन्शन स्वीकारलेल्या व सप्टेंबर २०१४ पासून मयत झालेल्या कामगारांच्या ३२ वारसांना प्रत्येकी ३ लाख ६२ हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला.
मुद्रणालयाचे महामंडळात रूपांतर झाल्यानंतर ज्या कामगारांनी प्रो-राटा पेन्शनचा पर्याय स्वीकारला होता अशा कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना ईपीएफ ट्रस्टद्वारे एम्प्लॉईज डेथ लिंक्ड इन्शुरन्स स्कीममधून प्रारंभी १ लाख १० हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर त्यामध्ये वाढ करून १ लाख ३२ हजार रुपये देण्यात येत होते. दिल्ली येथे ई.पी.एफ. ट्रस्टच्या झालेल्या बैठकीत ईपीएफ ट्रस्टी ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी या रकमेत वाढ करण्यास मंजुरी मिळविली. त्यामुळे सप्टेंबर २०१४ पासुन मयत कामगारांच्या वारसांना प्रत्येकी ३ लाख ६२ हजार रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार मुद्रणालयातील ३२ मयत कामगारांच्या वारसांना मजदूर संघाच्या कार्यालयात बुधवारी मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष माधवराव लहांगे, सुनील आहिरे, राजेश टाकेकर, उल्हास भालेराव, वेल्फेअर फंड कमेटीचे सचिव ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)