चोरी रोखण्यासाठी टोलनाक्यांची मदत
By admin | Published: February 18, 2016 12:10 AM2016-02-18T00:10:25+5:302016-02-18T00:10:46+5:30
गौणखनिज : वाहतूक वाहनांवर विशेष लक्ष
नाशिक : जिल्ह्यातून होणारी गौणखनिजाची चोरी व पर जिल्ह्यातून बेकायदा येणाऱ्या वाळूची तस्करी रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील टोलनाक्यांची मदत घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून, त्यासाठी बुधवारी टोलनाका व्यवस्थापकांची बैठक घेऊन अनेक विषयांवर खल करण्यात आला.
जिल्ह्यात वाळूच्या मोजक्याच ठिय्यांचा लिलाव झालेला असताना त्या मानाने मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले, त्याच बरोबर मुरूम, खडी, मातीचेही बेकायदा उत्खनन होऊन शासनाचे आर्थिक नुकसान होत असल्याने ते रोखण्यासाठी महसूल प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी गौणखनिजाची चोरटी वाहतूक अजूनही थांबलेली नाही. त्यामुळे ज्या रस्त्यांचा वापर तस्करांकडून केला जातो, त्यांना त्याच ठिकाणी अटकाव करण्याचा पर्याय तपासून पाहण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकाऱ्यांनी चांदवड, पिंपळगाव, घोटी व माडसांगवी टोलनाका व्यवस्थापकांची बैठक घेतली. त्यात नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबणाऱ्या व गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची ओळख पटविण्यासाठी काय करता येईल, यावर विचार विमर्श करण्यात आला.
टोल भरणाऱ्या वाहनात काय सामान भरले आहे हे पाहता यावे व तशी माहिती संबंधित शासकीय यंत्रणेला तत्काळ कशी पोहोचविता येईल, याची चाचपणीही करण्यात आली. टोलनाक्यावरच भरारी पथक कार्यान्वित केल्यास गौणखनिज चोरीला आळा बसू शकेल काय यावरही चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)