उघड्यावर संसार थाटलेल्या गरजूंना मदतीचा हात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 08:38 PM2020-05-06T20:38:59+5:302020-05-06T23:41:43+5:30
पेठ : गाव घराच्या ओढीने शेकडो किलोमीटर मुलाबाळांसह पायपीट करूनही कोरोनाच्या भीतीने गावात प्रवेश न मिळालेल्या आदिवासी मजुरांना अखेर गावाबाहेरच्या उघड्यावर आपला संसार थाटावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मात्र सोबतचा शिधा व पैसेही संपलेल्या या गरजू कुटुंबांना यशोदीप सामाजिक संस्थेने जीवनावश्यक साहित्य पोहोच करून मदतीचा हात पुढे केला.
आदिवासी भागातून रोजगारानिमित्त परजिल्ह्यात स्थलांतरित झालेले शेतमजूर कोरोनामुळे गावाकडे परतत असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने शेकडो मैल पायपीट करत मजूर गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे गावात कोरोनाचा शिरकाव होईल या भीतीने अनेक गावांमध्ये अशा मजुरांना प्रवेश नाकारला जात असल्याची वस्तू स्थिती पहावयास मिळत आहे. कामाचे ठिकाण व गाव दोन्हीपासून दुरावल्याने अनेक कुटुंबांना गावकुसावर उघड्यावर संसार थाटावा लागत असून, वाढत्या लॉकडाउनमुळे जवळचा शिधा व पैसेही संपत आल्याने अशा कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
पेठ शहरानजीक अशाच प्रकारच्या स्थलांतरित कुटुंबांची माहिती मिळाल्यानंतर यशोदीपचे अध्यक्ष गिरीश गावित व सहकाऱ्यांनी या नागरिकांना किराणा साहित्य वाटप केले.