‘त्या’ पीडित कुटुंबीयांना समाजाचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:12 AM2021-04-12T04:12:47+5:302021-04-12T04:12:47+5:30
----- नाशिक : जुने नाशिक भागातील वडाळा नाक्यावरील संजरीनगरमध्ये झालेल्या गॅस स्फोटात आतापर्यंत सात लोकांचा बळी गेला आहे. सय्यद, ...
-----
नाशिक : जुने नाशिक भागातील वडाळा नाक्यावरील संजरीनगरमध्ये झालेल्या गॅस स्फोटात आतापर्यंत सात लोकांचा बळी गेला आहे. सय्यद, अन्सारी हे दोन्ही कुटुंब उदध्वस्त झाले असून एवढी दुर्दैवी दुर्घटना घडूनदेखील लोकप्रतिनिधी घटनास्थळी फिरकले नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या पीडित कुटुंबीयांना मदतीचा हात म्हणून माणुसकीच्या नात्याने मुस्लीम समाजाने आतापर्यंत दीड ते पावणे दोन लाखाचा निधी उभा केला आहे.
गेल्या शुक्रवारी (दि.२) रात्री बारा वाजेच्या सुमारास रहीम सय्यद यांच्या घरात गॅस सिलिंडर संपले म्हणून दुसरे सिलिंडर बसवीत असताना घरात गॅस गळती होऊन मोठा स्फोट झाला. या स्फोटात तीन महिला आणि पाच पुरुष असे एकूण आठ लोक भाजले गेले. यापैकी सात जखमींचा मृत्यू झाला असून आरिफ अत्तार हे १० टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुर्घटना घडल्यानंतर नगरसेविका समीना मेमन यांनी दुसऱ्या दिवशी घटनास्थळी भेट देत पीडितांचे सांत्वन केले. मेमन यांचा अपवाद वगळता अद्याप एकही लोकप्रतिनिधी या ठिकाणी फिरकलेला नाही, असे रहिवाशांनी सांगितले. कोणीही खासदार, आमदार, महापौर यांनी घटनास्थळी येऊन पीडितांची साधी विचारपूस केली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
पीडित दोघा कुटुंबांच्या मदतीसाठी मुस्लीम समाजाने हात पुढे केला आहे. शहर-ए-खतीब हिसमुद्दीन अशरफी यांच्या परवानगीनंतर शहरातील विविध भागांतील मशिदींमधून प्रमुख धर्मगुरूंनी केलेल्या आवाहनाला समाजबांधवांनी प्रतिसाद देत सढळ हाताने चंदा दिला. त्यामुळे आतापर्यंत जवळपास दीड लाखांचा निधी उभारण्यास यश आले आहे, अशी माहिती मुदस्सर सय्यद यांनी दिली आहे.