नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:14 AM2021-03-22T04:14:11+5:302021-03-22T04:14:11+5:30
दैनंदिन दिनचर्या सुरू राहाण्याच्या दृष्टीने या बंदमधून अनेक बाबींना सूट देण्यात आलेली आहे. तरीही बाजारपेठेतील गर्दी अपेक्षेप्रमाणे कमी होताना ...
दैनंदिन दिनचर्या सुरू राहाण्याच्या दृष्टीने या बंदमधून अनेक बाबींना सूट देण्यात आलेली आहे. तरीही बाजारपेठेतील गर्दी अपेक्षेप्रमाणे कमी होताना दिसत नाही. लग्नसोहळ्यांनाही उपस्थितीची मर्यादा घालून दिलेली असताना नियमांचे उल्लंघन होताना दिसते. प्रशासनाकडून कारवाई केली गेली, दंड आकारणी केली गेली तरच नियमांचे पालन करण्याची नागरिकांनी मानसिकता झाल्याची खंत अनेकदा जिल्हाधिकाऱ्यांनी बोलूनही दाखविली आहे. नियमपालनात नागरिकांचा सहभाग जास्तीत जास्त वाढण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
आता या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनीच नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना साकडे घातले आहे. मागील वर्षी अनेक संस्थांनी खाद्यपुरवठा केला होता. यावेळी जीवनावश्यक वस्तूंची सर्व व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ तसेच अन्य वस्तूंची आवश्यकता नसून नागरिकांना स्वयंशिस्त लावण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
--कोट-
नावीन्यपूर्ण पावले उचलावीत
केारोनाच्या लढाईत नागरिकांच्या प्रबोधनासाठी तसेच त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी काही नावीन्यपूर्ण पावले उचलण्यासाठी स्वयंसेवी संस्था, जबाबदार नागरिक यांनी भूमिका पार पाडून प्रशासनाला सहकार्य करावे.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.