खासगी डॉक्टरांचीही घेणार मदत
By admin | Published: March 21, 2017 12:16 AM2017-03-21T00:16:25+5:302017-03-21T00:16:45+5:30
पालकमंत्री : स्वाइन फ्लूबाबत आरोग्य सुविधेचा घेतला आढावा
पालकमंत्री : स्वाइन फ्लूबाबत आरोग्य सुविधेचा घेतला आढावानाशिक : नाशिकमध्ये स्वाइन फ्लू आजाराचे रुग्ण आढळत असल्याने व काही रुग्णांचा मृत्यूही झाल्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शासकीय विश्रामगृह येथे तातडीने बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी स्वाइन फ्लूबाबत जनजागृती करण्यावर भर द्यावा, असे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी या आजाराच्या उपचाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.
शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्र्यांनी बैठक बोलविली होती. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, डॉ. राहुल अहेर, अपूर्व हिरे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, उपमहापौर प्रथमेश गिते उपस्थित होते. यावेळी महाजन यांनी स्वाइन फ्लू रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची आणि शासकीय रुग्णालयांमधील विलगीकरण कक्षांची माहिती घेतली. तातडीने उपचार करणे गरजेचे असल्याने याबाबत खासगी डॉक्टरांचीही बैठक घेऊन त्यांना रुग्णांची माहिती देण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. आठवडे बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष काळजी घेण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी स्वाइन फ्लू नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपायोजनांची माहिती दिली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. पी. जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाघचौरे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी स्वाइन फ्लू रुग्णांवरील उपचाराची माहिती दिली.